मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

देशामध्ये उद्योजकांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती आहे. पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब असून जर्मनीपाठोपाठ चीनमधील अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हायर इंडिया इंडस्ट्रिअल पार्कच्या माध्यमातून या रांजणगाव परिसरात रोजगार निर्मितीबरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.

रांजणगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) हायर इंडस्ट्रिअल पार्कचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. हायर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष लियांग हॅशन, हायर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक साँग युजुन, अध्यक्ष इरीक ब्रगॅन्झा आणि आमदार बाबुराव पाचर्णे या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, दोन वर्षांपूर्वी चीन दौऱ्यामध्ये हायर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राज्य शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलामुळे हे शक्य झाले. हायर इंडिया इंडस्ट्रिअल पार्क हा देशातील पहिला औद्योगिक पार्क असून त्यामुळे राज्यातील उद्योग जगतात सकारात्मक बदल होणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. त्याचबरोबर या परिसरातील पायाभूत सुविधांमध्येही आमूलाग्र बदल होतील. मेक इन महाराष्ट्र अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राला गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यासाठी अनुकूल उद्योग धोरण, कुशल मनुष्यबळ कारणीभूत आहे. राज्यात इंग्लंड, जपान, अमेरिका, जर्मनी, नेदरलँड या देशातील उद्योजकांची मोठी गुंतवणूक आहे. पुणे हे देशातील आठवे मोठे महानगर असून प्रतिमाणसी उत्पादनात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो.

पुणे शहर परिसरात मोठय़ा प्रमाणावर ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्याचबरोबरीने जागतिक बँकेच्या सहकार्याने फूड क्लस्टर म्हणूनही पुणे विकसित होत आहे. भाजीपाला आणि फळांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग येथे उभे राहणार आहेत. राजीव गांधी आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक सॉफ्टवेअर, हार्डवेअर कंपन्याही पुणे परिसरात कार्यरत आहेत. इंडो-जर्मनी करारामुळे पुणे परिसरात दोन हजारांहून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आता चीनच्याही अनेक कंपन्या येथे येत असून या पार्कच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.