३० टक्के  कंपन्या करोनापूर्व काळातील उत्पादन पातळीवर; कार्यरत मनुष्यबळ वाढल्याने उत्पादनातही वाढ; एमसीसीआयएच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

पुणे : टाळेबंदी हटवल्यानंतर पुणे जिल्ह्यतील उद्योग क्षेत्रात येत्या काही महिन्यांत पूर्वपदावर येण्याचे चित्र मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरने (एमसीसीआयए) केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाण वाढल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होत असून सर्वेक्षणातील सहभागी कंपन्यांपैकी ३०  टक्के  कंपन्यांचे करोनापूर्व काळाइतके उत्पादन होऊ लागले आहे.

‘एमसीसीआयए’च्या सर्वेक्षण मालिकेतील सातव्या सर्वेक्षणातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी २७ टक्के  सूक्ष्म, ३३ टक्के  लघु, १७ टक्के  मध्यम आणि २२ टक्के  मोठय़ा कंपन्या आहेत. ६६ टक्के  कंपन्या उत्पादन क्षेत्रातील, १६  टक्के  कंपन्या सेवा क्षेत्रातील आणि उर्वरित कंपन्या उत्पादन आणि सेवा अशा दोन्ही क्षेत्रातील आहेत. सप्टेंबरमधील (७७ टक्के) उत्पादनाच्या तुलनेत ऑक्टोबरमधील उत्पादन ७२ टक्कय़ांवर पोहोचले आहे. तर कार्यरत मनुष्यबळाचे प्रमाण सप्टेंबरच्या तुलनेत (६८ टक्के) ऑक्टोबरमध्ये वाढले आहे. ऑक्टोबरमध्ये ७७ टक्के  मनुष्यबळ कार्यरत असल्याची माहिती सर्वेक्षणातील कंपन्यांनी दिली.

करोना संसर्गामुळे लागू केलेल्या टाळेबंदीत कंपन्यांचे नुकसान झाले होते. मात्र गेल्या चार महिन्यांमध्ये कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वेक्षणात सहभागी कं पन्यांपैकी जवळपास ३० टक्के  कंपन्यानी करोना पूर्व काळातील (जानेवारी) उत्पादन पातळी गाठली आहे. ११ टक्के  कंपन्यांना करोना पूर्व काळाइतक्या उत्पादनाचा टप्पा गाठण्यासाठी आणखी किमान तीन महिने लागतील असे वाटते. २८  टक्के  कंपन्यांनी तीन ते सहा महिने आणि तीन टक्के  कंपन्यांनी नऊ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल असे सांगितले. तर ११  टक्के  कंपन्याकडून अनिश्चितता दर्शवण्यात आली.

करोना संसर्ग, टाळेबंदीचा सूक्ष्म आणि लघु उद्योग, पर्यटन, आतिथ्य सेवा क्षेत्रांना मोठा फटका सहन करावा लागला. छोटय़ा कं पन्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान निर्माण झाले. अनेक छोटय़ा कं पन्या कायमस्वरूपी बंदही झाल्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून उद्योगक्षेत्र पूर्वपदावर येणे दिलासादायी आहे. मात्र सरकारकडून कं पन्यांना देय असलेली रक्कम अजूनही प्रलंबित आहे. सरकारने त्यांची देणी तातडीने दिल्यास कं पन्यांना आर्थिक दिलासा मिळेल. येत्या काळात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने वैद्यकीयदृष्टय़ा सज्ज  असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच उद्योग क्षेत्राला कोणताही फटका बसणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आता टाळेबंदी हा पर्याय परवडणारा नाही.

– सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए