दुसऱ्या दिवशीही उद्योगनगरीत सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी : टाळेबंदीच्या दुसऱ्या दिवशीही पिंपरी-चिंचवडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे बुधवारी (१५ जुलै) शहरभरातील जवळपास सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. औद्योगिक पटय़ातील उद्योगधंदे सुरू होते. मात्र, काही प्रमाणात अडचणी भेडसावत असल्याच्या तक्रारी होत्या.

करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. बुधवारी, दुसऱ्या दिवशीही शहरवासीयांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत भागात पूर्णपणे शुकशुकाट होता. पोलिसांनी शहरभरात जागोजागी कृत्रिम अडथळे तयार केले होते. आवश्यकतेनुसार वाहनस्वारांची तपासणी करण्यात येत होती. विनाकारण फिरणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येत होती.

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पटय़ातील उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, काही कंपन्या मर्यादित क्षमतेनुसार सुरू आहेत. कामगारांना दुचाकीवरून कामावर येण्यास परवानगी दिल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. मालवाहतूक, सुटे भाग तसेच इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने पोलिसांकडून अडवण्यात येत असल्याच्या तक्रारी होत होत्या. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या पासद्वारे पहिल्या दिवशी पेट्रोल दिले जात नव्हते. मात्र, बुधवारी ती अडचण दूर झाल्याचे सांगण्यात आले.