पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने, सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. करोना विषाणूची साखळी तोडण्याच्या हेतूने हे लॉकडाउन जाहीर करण्यात येत आहे, हे अगोदरच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 13 जुलै (मध्यरात्री) ते 23 जुलै दरम्यान हे लॉकडाउन लागू होणार आहे. यामधून दूध विक्री, औषधांची दुकाने, रुग्णालये आदींना वगळण्यात आले आहे. यादरम्यानची नियमावली आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहिर केली आहे.

यात आठवडी बाजार, फेरीवाले, बांधकामाची कामे, मंगल कार्यालये, किराणा दुकान, किरकोळ विक्रेते, सर्व व्यवसाय, भाजी मंडई, धार्मिक स्थळे, सर्व खासगी कार्यालये पूर्ण बंद राहणार आहेत. तर आयटी क्षेत्रातील कंपन्यांना 15 टक्के कामगार ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, बांधकाम साईट्स येथील कामगारांची तिथेच राहण्याची सोय केल्यास बांधकाम सुरू राहणार असल्याच नियमावलीत म्हटलं आहे. शहरातील खासगी जागेतील उद्योग आणि एमआयडिसी सशर्त सुरू ठेवण्याची परवानगी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नियमावली खालील प्रमाणे –

सर्व किराणा दुकान, किरकोळ व ठोक विक्रेते, व्यापारी दुकाने हे दिनांक 14 जुलै ते 18 जुलै पर्यंत पूर्णतः बंद राहतील. त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीत सकाळी आठ ते दुपारी बारा वाजे पर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने व अस्थापन बंद राहतील.

फळ विक्रेते, आठवडी बाजार, फेरीवाले हे 14 ते 18 जुलै पर्यंत पूर्णतः बंद राहतील त्यानंतर 19 जुलै ते 23 जुलै या दरम्यान सकाळी अधिकृत फळ, भाजी, फेरीवाले, आठवडी बाजार हे सकाळी आठ ते दुपारी बारा पर्यंत सुरू राहतील.

मटण, चिकन, अंडी, मासे इत्यादी ची विक्री कणारे दुकाने 14 ते 18 जुलै बंद त्यानंतर 19 ते 23 जुलै ला सकाळी 8 ते दुपारी 12 सुरू राहतील.

शाळा, महाविद्यालय, शौक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकार ची शिकवणीचे वर्ग बंद राहणार

सार्वजनिक आणि खासगी वाहने बंद, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळण्यात आली आहे.

बांधकाम साईट्स बंद राहतील पण कामगारांची राहण्याची सोय केल्यास काम सुरू ठेवता येणार आहे.

लग्न समारंभ करण्यास अगोदरच परवानगी घेतली असेल तर 20 जनांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा  करता येईल.

पेट्रोल पंप हे केवळ शासकीय वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील.

पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडिसी किंवा खासगी जागेतील उद्योग सुरू राहणार आहेत.