वेबिनारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मार्गदर्शन

पुणे : राज्यभरातील ५४ हजार ७४५ उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी २५ हजार कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील ५ हजार ७७४ कंपन्या आहेत. राज्यभरात सुमारे साडेसहा लाख कामगार कार्यरत आहेत. लघु उद्योगांसाठीच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिली.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे  (एमसीसीआयए) आयोजित वेबिनारमध्ये देसाई बोलत होते. उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा, महासंचा लक प्रशांत गिरबने, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग समितीचे दीपक करंदीकर यांच्यासह सुमारे ४००हून अधिक उद्योजक वेबिनारमध्ये सहभागी झाले.

उद्योगक्षेत्र पूर्वपदावर आणण्यासाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. लाल श्रेणी वगळता राज्यभरातील ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात परवाने दिलेल्या ९ हजार १४७ कारखान्यांपैकी ५ हजार ७७४ कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. करोनाचा फटका बसलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्यात उद्योगांना विजेच्या स्थिर आकारातून सूट देण्यात आल्याने केवळ प्रत्यक्ष वापराचेच शुल्क द्यावे लागेल. एमआयडीसीतील भूखंड विकसित न के लेल्या उद्योजकांना दंडातून सूट देण्यात आली आहे. तसेच अन्य सवलतींसाठी एक विशेष समिती (टास्क फोर्स) काम करत आहे. त्या माध्यमातून नवे धोरण आखले जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

विदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न

चीनमधून अनेक कंपन्या आपले उत्पादन केंद्र हलवण्याच्या तयारीत आहेत. या कं पन्यांना राज्यात आणून विदेशी गुंतवणूक होण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करत आहेत. त्याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. मोठे उद्योग राज्यात आल्यास त्याचा फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना होऊन अनेक पूरक उद्योग आणि सेवा व्यवसाय उभे राहतील, असे देसाई यांनी नमूद के ले.

घाई करणे योग्य नाही

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र हा भाग लाल श्रेणीमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी मे अखेपर्यंत महाराष्ट्र हिरव्या श्रेणीत आणण्याचा संकल्प केला आहे. सद्य:स्थितीत करोनावर मात करणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारे घाई करणे योग्य नाही, असेही देसाई यांनी सांगितले.