‘स्त्री-पुरूष विषमता ही समाजातील सर्वात मोठी समस्या आहे. स्त्रियांना त्यांच्यातील क्षमतेची जाणीव होणे आवश्यक आहे,’ असे मत सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी ज्योती फाउंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये रविवारी व्यक्त केले.
ज्योती कुलकर्णी रीसर्च फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. ‘ज्योती कृषिकन्या’ पुरस्कार मीरा तांबे यांना देण्यात आला. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ‘ज्योती उद्योगिनी पुरस्कार’ स्वाती जोशी, निशा भगत, माधुरी खांदवे, सविता गावकर यांना देण्यात आला. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रत्येकी २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ‘ज्योती वसुंधरा’ पुरस्कार स्वाती गोळे यांना देण्यात आला असून मानचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रत्येकी १५ हजार रुपये असे स्वरूप होते. या वेळी ज्योती फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पुष्परचना स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष अश्विनी देशपांडे, विश्वस्त हेमंती कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी, अवंती बायस, गीता भुर्के आदी उपस्थित होते.
या वेळी बाळ म्हणाल्या, ‘‘महिला पुरूषांच्या तुलनेमध्ये अधिक कर्तृत्व दाखवू शकतात. मात्र, महिलांना त्यांच्यातील शक्तीची जाणीव होणे गरजेचे आहे. एकविसाव्या शतकातही महिलांना समानता दिली जात नाही. महिलेला आजही घरात दुय्यम वागणूक मिळते. ही परिस्थिती बदलेल तेव्हाच देश खऱ्या अर्थाने प्रगत होईल.’’