जन्मानंतर श्वास न घेता आल्यामुळे गुदमरून मृत्यू पावणाऱ्या अर्भकांची संख्या राज्यात आणि शहरातही गेल्या पाच वर्षांत कमी झाली आहे. २००८ मध्ये दर हजारी २२ अर्भकांचा मृत्यू होत असे. हे प्रमाण सध्या १६ पर्यंत खाली आल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.
‘इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स’ (आयएपी) या डॉक्टरांच्या संघटनेने ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीसह सुरू केलेल्या ‘फर्स्ट गोल्डन मिनिट’ या अभियानाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. या वेळी सूर्यवंशी बोलत होते. अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने २००९ पासून हे अभियान सुरू करण्यात आले असून त्यात अर्भकांचा श्वास गुदमरून होणारा मृत्यू टाळण्यासाठी प्रसूती करणारे डॉक्टर, परिचारिका आणि सुइणींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. आयएपीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. पन्ना चौधरी, जॉन्सन अँड जॉन्सनचे व्यवस्थापक मनीष टंडन या वेळी उपस्थित होते.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ‘‘राज्याचा अर्भक मृत्यू दरही अनेक प्रयत्नांच्या परिणामामुळे घटला असून तो गेल्या पाच वर्षांत ३६ वरून २५ वर आला आहे. जन्माला आल्यानंतर श्वास घेता न येणे हे अर्भक मृत्यूचे महत्त्वाचे कारण ठरत असून या अभियानात राज्यातील सरकारी व खासगी दवाखान्यांमधील ७ ते १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना या विषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील काळात प्राथमिक आरोग्य केंद्रे व गावांमध्ये प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल.’’
२३ टक्के अर्भक मृत्यू केवळ श्वास घेऊ न शकल्यामुळे होतात, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘जन्मल्याबरोबर लगेच श्वास न घेता आल्यामुळे मूल रडत नाही आणि पुरेशा ज्ञानाअभावी त्याला मृत घोषित केले जाते. गुदमरलेल्या अर्भकाचा श्वास सुरू करण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना शिकवले जाते. यासाठी विशिष्ट प्रकारची हवा भरण्याची पिशवी आणि मास्क वापरला जातो.’’