पुण्यातील इन्फोसिस या आयटी कंपनीतील एका कर्मचाऱ्याला करोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी जास्त खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. कंपनीनेच याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेलव्दारे एक निवेदनाने याबाबत माहिती दिली आहे.

इन्फोसिसने आपल्या निवदेनात म्हटले की, ज्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे त्याला आपण सर्व प्रकारची मदत पुरवणार आहोत. त्याचबरोबर आरोग्य विभागाशी संपर्क साधून इतरही बाधितांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर याबाबत आवश्यक ती पावलं उचलण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. रिपब्लिक या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले आहे.

तसेच अनावश्यक भीतीपासून वाचण्यासाठी, संभाव्य व्यक्तींच्या संपर्कात आल्याचे जर कोणाला वाटत असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून अशा व्यक्तीनं चौदा दिवसांसाठी स्वतःला घरात क्वारंटाइन करुन घ्यावं, असा सल्लाही कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याचबरोबर शासकीय आरोग्य सल्लागाराद्वारे कळविलेल्या उपायांबाबत सल्ला घ्यावा, असेही आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील ४८ तास चालणार कॅम्पसची स्वच्छता

या निवदेनात असंही म्हटलंय की, कंपनीकडून संपूर्ण कॅम्पसची पूर्णपणे स्वच्छता करण्यात येईल तसेच प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाईल. दरम्यान, स्वच्छतेसाठी SDB 1, SDB 4 and FC 1 हे विभाग बंद ठेवण्यात येणार आहेत. इथं पुढील ४८ तास (मंगळवारी संध्याकाळपर्यंत) स्वच्छतेचं काम चालणार आहे.

म्हैसूरच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना पाठवलं घरी

त्याचबरोबर इन्फोसिसच्या म्हैसूर येथील प्रशिक्षण केंद्रात सध्या ८००० ट्रेनी प्रशिक्षण घेत आहेत. त्या सर्वांना कंपनीने करोनाचा प्रभाव ओसरेपर्यंत घरी जाण्यास सांगितलं आहे.