‘इन्फोसिस फाउंडेशन’ने ‘आयसर’ (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च) संस्थेबरोबर करार केला असून त्यातून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संशोधनात्मक विज्ञान शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती व विद्यावृत्ती दिल्या जाणार आहेत. ‘इन्फोसिस’तर्फे ‘आयसर’ला पाच कोटींचा निधी देण्यात आला असून दरवर्षी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ५० गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती संस्थेचे संचालक के. एन. गणेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या निधीतून ‘बीएस-एमएस’ हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘इन्फोसिस फाउंडेशन शिष्यवृत्ती’ व पीएच. डी. पदवी घेणाऱ्यांना ‘इन्फोसिस फाउंडेशन विद्यावृत्ती’ प्रदान करण्यात येणार असून त्यात संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाईल. याशिवाय पीएच.डी.मध्ये संशोधनात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना परिषदांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवास शिष्यवृत्तीही (ट्रॅव्हल अ‍ॅवॉर्ड) दिली जाणार आहे.
‘‘फाउंडेशनच्या सुधा मूर्ती यांनी अचानक ‘आयसर’ला भेट दिली आणि भेटीनंतर चोवीस तासांच्या आत निधी देत असल्याबाबत ई-मेल देखील पाठवला,’’ असे गणेश यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र साकारणार;  बांधकाम व्यावसायिकाकडून मदत
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही विज्ञानात गोडी निर्माण व्हावी यासाठी ‘आयसर’च्या परिसरात ४० हजार चौरस फुटांच्या जागेत प्रयोगशाळा बांधली जाणार आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक बालन व पुनीत बालन यांनी यासाठी मदत दिली असून प्रयोगशाळेस ‘श्रीमती इंद्राणी बालन सायन्स अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर’ असे नाव दिले जाईल. या केंद्राची इमारत बांधल्यानंतर पुढील दहा वर्षे त्याची देखभाल करणार असल्याचे बालन यांनी सांगितले. या केंद्रात विज्ञानातील प्रयोगांच्या सादरीकरणासह व्याख्याने, विज्ञान प्रदर्शने असे उपक्रम होणार असल्याचे के. एन. गणेश म्हणाले.