News Flash

नव्या वर्षांत.. : प्रकल्प पूर्तीच्या वार्तेने आनंदकल्लोळ..

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हरित इमारतींचे बांधकामही याच वर्षांत होणार आहे

नव्या वर्षांतील या काही आनंद देणाऱ्या बातम्या. भामा आसखेड योजनेचे काम या वर्षांत पूर्ण होईल, पिंपरीच्या भक्ती शक्ती चौकातील महत्त्वाचा उड्डाण पूलही या वर्षांत वाहतुकीला खुला होईल. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हरित इमारतींचे बांधकामही याच वर्षांत होणार आहे आणि पिंपरी प्राधिकरणाच्या गृहयोजनेतील घरे मिळण्यासही या वर्षांत सुरुवात होईल. तरुणांचा व्यायामाकडे वाढत असलेला कलदेखील नव्या वर्षांतील एक चांगली बातमी आणि आणखी एक चांगली बातमी म्हणजे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नव्या वर्षांच्या दुसऱ्याच आठवडय़ात दोन विख्यात शास्त्रज्ञांना ऐकण्याची दिलेली संधी.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर शहरासह जिल्ह्य़ात आठ हरित इमारती

प्रथमेश गोडबोले, पुणे

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी हरित इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीला केंद्र सरकारच्या गृह संस्थेकडून पाच तारांकित मानांकन मिळाले असून त्याच धर्तीवर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्य़ात आठ हरित इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत मुंबईतील मंत्रालयानंतरची राज्यातील पहिलीच हरित निकषांवर आधारित इमारत आहे. या इमारतीला नुकतेच पंच तारांकित मानांकन प्राप्त झाले आहे. त्याच धर्तीवर शहरासह जिल्ह्य़ातील आठ इमारती पीडब्ल्यूडीकडून बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून नव्या वर्षांत काम सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामामध्ये पर्यावरणपूरक बांधकाम साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. पाणी, वीज यांची बचत कशी होईल, या पद्धतीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. उन्हाळ्यात कार्यालयांमध्ये अतिउष्णता जाणवू नये म्हणून विशिष्ट प्रकारचा रंग देण्यात आला असून त्यामुळे वातानुकूल यंत्रांचा फारसा वापर करावा लागत नाही. जुन्या इमारतीचे दगडही नव्या इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आले आहेत. पर्जन्य जल पुनर्भरण यंत्रणेद्वारे छतावर पडणारे पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था असून कार्यालयाच्या आवारातील विंधन विहिरींसाठी देखील त्याचा उपयोग होतो. हरित इमारती उभ्या करण्यासाठी आवश्यक सर्व निकषांचा वापर बांधकाम करताना करण्यात आला आहे. त्यानुसारच नव्या इमारती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

मेडा इमारत (महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी – एमईडीए), पाबळ ग्रामीण रुग्णालय, नीरा नरसिंगपूर भक्तनिवास, ट्रॉमा केअर यवत ता. दौंड, जुन्नर आणि इंदापूर येथील न्यायालयाच्या इमारती आणि मुंबईतील राजभवन या इमारती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर हरित इमारती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विकसित करण्यात येणार आहेत.

– विनय कुलथे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

जुन्या इमारतींनाही केंद्राची मानांकने

पीडब्ल्यूडीकडून बांधण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी सर्किट हाउसच्या इमारतीलाही पंचतारांकित मानांकन मिळाले आहे. तर, राजभवन, ससून रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध, कुटुंब कल्याण केंद्र औंध, येरवडा मनोरुग्णालय, दौंड आणि यवत ग्रामीण रुग्णालय या इमारतींना केंद्र सरकारच्या संस्थांकडून (एक्झिटिंग बिल्डिंग रेटिंग – ईबीआर) मानांकने प्राप्त झाली आहेत. या जुन्या इमारती असून त्यांची विस्तारित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हरित इमारतींच्या धर्तीवर करण्यात आली आहेत. या इमारतींची कामे पहिल्या टप्प्यात करण्यात आली असून पुढील दोन टप्प्यात उर्वरित कामे करण्यात येणार आहेत.

नव्या वर्षांत पूर्व भागाला भामा आसखेडमधून पाणीपुरवठा

अविनाश कवठेकर, पुणे

नव्या वर्षांत शहराच्या पूर्व भागाला भामा आसखेड योजनेतून पाणी मिळणार आहे. कळस, धानोरी, वडगाव शेरी, चंदननगर या पूर्व भागांसाठी वरदान ठरणाऱ्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून केवळ चार किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम होणे बाकी आहे. हे काम वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत आले असून ही प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून पूर्व भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी २०१४ मध्ये भामा आसखेड पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारकडून जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत हा प्रकल्प मान्य करण्यात आला. त्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न महापालिकेतील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारकडन करण्यात आला. मात्र, राजकीय मतभेदात हा प्रकल्प अडकला. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर या योजनेचे काम विविध मुद्दय़ांवर बंद पाडण्यात आले.

पुनर्वसन, नुकसान भरपाईची रक्कम, राजकीय अडथळे अशा कामांमुळे या योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. अखेर हे सर्व अडथळे दूर झाले आहेत. नव्या वर्षांत पूर्व भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केले जाईल. या योजनेअंतर्गत चार किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पोलिसांचे आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडून देण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव आणि महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी दीर्घ कालावधी लागणार नाही. चार किलोमीटर लांबीच्या वाहिनीचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. त्यामुळे महापालिकेच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या एका प्रकल्पाचे काम यशस्वी रीत्या पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

भक्ती शक्ती चौकातील उड्डाण पुलावरून वाहतूक

प्रतिदिन तीन लाख वाहनचालकांची सोय, निगडीतील वाहतूक कोंडीवर उपाय

बाळासाहेब जवळकर, पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकात पिंपरी पालिकेच्या वतीने तब्बल ९० कोटी रुपये खर्च करून भव्य उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झालेला हा पूल ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत शहरवासीयांना उपलब्ध होऊ शकेल, या दृष्टीने पिंपरी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रतिदिन तीन लाख वाहनांची रहदारी असणाऱ्या या चौकात अशाप्रकारचा उड्डाण पूल झाल्यानंतर शहराच्या वैभवात भर पडण्याबरोबरच येथील वाहतूक कोंडीची समस्याही सुटणार आहे.

भक्ती-शक्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित समूहशिल्प आहे. १०७ फूट उंचीचा राष्ट्रध्वज याच ठिकाणी आहे. नियोजित उड्डाण पुलामुळे येथील सौंदर्यात भर पडणार आहे. जुना मुंबई-पुणे रस्ता आणि िपपरी प्राधिकरणाचा स्पाइन रस्ता एकत्र येणाऱ्या या चौकात वाहनांच्या वाढत्या संख्या आणि अपुरे रस्ते यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात भर म्हणजे, भक्ती-शक्ती ते मुकाई चौक असा बीआरटीएस रस्ता विकसित करण्यात येत असून येथे बीआरटीएसचे टर्मिनसही होणार आहे.

रावेतला रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. देहूरोड-निगडी महामार्गाचे रुंदीकरणही होत असून निगडी-दापोडी बीआरटी मार्गही सुरू होणार आहे. यामुळे भक्ती-शक्ती चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतूक वाढणार आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून पालिकेने हा चौक ‘सिग्नल फ्री’ करण्यासाठी पुलाचे नियोजन केले. ग्रेड सेपरेटर, वर्तुळाकार रस्ता आणि उड्डाण पूल अशी रचना असणारा हा पूल प्राधिकरणाकडून पुणे, भोसरी, मुंबई, नाशिककडे जाण्यासाठी तसेच तिकडून येण्यासाठी वापरता येणार आहे. यासाठी ९० कोटी ५३ लाख रुपये खर्च होणार आहे. आतापर्यंत ८० टक्के काम झाले आहे. उर्वरित २० टक्के कामासाठी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत कामाची मुदत नुकतीच वाढवून देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत या पुलाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तंदुरुस्ती राखण्याकडे वाढता कल

पुणे : सध्याच्या धकाधकीच्या काळात लहान वयापासूनच आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तंदुरुस्ती राखण्यासाठीच्या अभ्यासक्रमांकडील कल वाढू लागला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील योग प्रशिक्षक तसेच व्यायामशाळा प्रशिक्षक या अभ्यासक्रमांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दैनंदिन कामांची धावपळ, अपुरी झोप आणि खाण्याच्या अयोग्य सवयींमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. विशेषत विद्यार्थ्यांमध्ये या समस्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेऊन केंद्र शासनानेही खेलो इंडिया, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून फिट इंडिया अशा मोहिमा हाती घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शास्त्रशुद्ध पद्धतीने तंदुरुस्ती राखण्यासाठीचे प्रशिक्षण घेण्याकडे कल वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे.

विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे योग प्रशिक्षक आणि व्यायामशाळा प्रशिक्षक हे दोन स्वतंत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवण्यात येतात. त्यासाठी वर्षांतून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया होते. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही अभ्यासक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. योग प्रशिक्षक अभ्यासक्रमाच्या सर्व ५० जागा पूर्ण भरत आहेत. त्याशिवाय वाढत्या प्रतिसादामुळे या अभ्यासक्रमासाठी दहा जागा वाढवाव्या लागल्या आहेत. तर व्यायामशाळा प्रशिक्षक या अभ्यासक्रमाच्या ५० जागांसाठी ३८ प्रवेश झाले आहेत. येत्या काळात ही संख्या वाढण्याची अपेक्षा असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

पिंपरी प्राधिकरणाचे गृहप्रकल्प यंदा मार्गी

पिंपरी : पिंपरी प्राधिकरणाने १४ हजार घरांच्या बांधणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. नव्या वर्षांच्या अखेपर्यंत या प्रकल्पातील काही घरे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. विविध सुविधांनी युक्त असे प्रकल्प प्राधिकरणाकडून तयार होत असल्याने शहरातील नागरिकांच्या घरांची गरज नव्या वर्षांत काही प्रमाणात पूर्ण होणार आहे.

पिंपरी प्राधिकरणाने पेठ क्रमांक ३० आणि ३२ मध्ये ७९२ घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये १२८ इमारती आणि ५५ विंग आहेत. त्यातील १७ विंगचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून नवीन वर्षांत या प्रकल्पाचे बहुंताश काम पूर्ण होईल. ७९२ सदनिकांपैकी ४०० सदनिकांचे वितरण प्राधिकरणाकडून वर्षअखेपर्यंत करण्यात येणार आहे. सदनिकांच्या किमतीही सामान्य नागरिकांच्या आवाक्यातील आहेत. त्यामुळे घराची आवश्यकता असलेल्या नागरिकांना या प्रकल्पात तयार होणाऱ्या सदनिका खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय   प्राधिकरणाने पेठ क्रमांक १२ भोसरी येथे चार हजार ८८३ सदनिकांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पात आर्थिकदृष्टय़ा मागास नागरिकांसाठी तीन हजार ३१७ सदनिका, तर अल्प उत्पन्न गटासाठी एक हजार ५६६ सदनिका बांधण्यात येत आहेत.

पेठ क्रमांक १२ मधील प्रकल्पात आर्थिकदृष्टय़ा मागास नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या ३७२ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठीच्या १२८ सदनिका तयार झाल्या आहेत. याशिवाय प्राधिकरणाने पेठ क्रमांक ६ मोशी येथे ३८३ सदनिका आणि १७ ‘रो हाऊस’चा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षांत प्राधिकरणाकडून शहरातील नागरिकांना घरांची भेट मिळणार आहे.

पेठ क्रमांक ३० आणि ३२ मधील गृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या वर्षअखेपर्यंत ४०० सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. उर्वरित सदनिकांची विक्रीही लवकर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण, पिंपरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 2:59 am

Web Title: infrastructure project in pune likely to complete by 2020 zws 70
Next Stories
1 रुग्णालयातील महिला कर्मचारी दीड तास लिफ्टमध्ये अडकल्या
2 सिंहगडावर धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण
3 हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सरत्या वर्षांला निरोप
Just Now!
X