पुणे शहरातील तुळशीबाग आणि फॅशन स्ट्रीट ही बाजारपेठ तरुणाईने नेहमी गजबजलेली असते. पण, काल(दि.२६) रात्रीच्या सुमारास कॅम्पमधील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागल्याची घटना घडली आणि या घटनेत 600 हून अधिक दुकाने जळून खाक झाली. या घटनेनंतर फॅशन स्ट्रीटचे दुकानदार हतबल झाले असून ‘अगोदर करोनानं आणि आता आगीनं मारलं’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

आगीच्या घटनेत ज्या दुकानदारांची दुकाने खाक झाली त्यापैकी किशोर खिल्लारे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “अगोदर आम्हाला करोनामुळे दुकानं अनेक महिने बंद ठेवावी लागली होती. त्याने अगोदर मारलं आणि आता या आगीने मारलं. त्यामुळे आता कसं जगायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला नव्याने उभा राहण्यासाठी मदत करा”, अशी मागणी त्यांनी केली. किशोर खिल्लारे म्हणाले की, “मी 24 वर्षांपासून फॅशन स्ट्रीटमध्ये कपडे विक्रीचा व्यवसाय करतो. या ठिकाणी आजवर अनेक घडामोडी पहिल्या आहेत. पण अशा स्वरूपाची आग कधीच पाहिली नाही. माझ्यासह सर्वांचंच आयुष्य या आगीने संपवलं आहे. अगोदरच करोनामुळे आठ महिने दुकान बंद होती. या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतो. आता हळूहळू सर्व सुरू झाले होते. पण शाळा, महाविद्यालय बंद असल्याने अगदी तुरळक खरेदी येथे होत होती झाली. काही प्रमाणात पहिल्यासारखा व्यवसाय सुरू झाल्याने थोडासा दिलासा मिळाला होता. त्यामुळे आता पुढच्या सणाच्या दृष्टीने आम्ही सर्वांनीच लाखो रुपयांची खरेदी केली होती. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत पैसे मिळतील आणि हळूहळू आपले जीवन पूर्वपदावर येईल असं वाटत होतं. पण काल आम्ही सर्वजण दहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेलो. घरी जाऊन बसत नाही. तोवर फोन आला की दुकानांना चारही बाजूने आग लागली आहे. याठिकाणी 600 हून अधिक दुकानं आहेत. त्यामुळे भीती होती ती नेमकी कशाप्रकारे आग असेल. त्याच विचारात इथे येऊन पोहोचलो, आगीने रौद्र रूप धारण केले होते. माझं दुकान मध्यभागी असल्याने, मी आशा सोडली. आपले दुकान देखील जळून खाक झालं असणार, आग मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला थांबून दुकानं जळताना पाहत राहिलो. मी रात्रभर इथे बसून आहे. आज शनिवार आणि उद्या रविवार हे दोन्ही दिवस आमच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. पण आज दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. आता काय करावं सुचत नाही. आता एवढंच वाटतं आम्हाला पुन्हा नव्याने व्यवसाय उभारण्यासाठी सरकार किंवा समाजातील दानशूर व्यक्तीने काहीतरी मदत करावी”.

फॅशन स्ट्रीट बाहेर कामगारांची एकच गर्दी :-

फॅशन स्ट्रीटमध्ये जवळपास 600 हून अधिक दुकाने आहेत. या ठिकाणी प्रत्येक दुकानात साधारण दोन कामगार असून जवळपास हजारच्या आसपास कामगारांनी नेमकी आपल्या दुकानाची काय अवस्था झाली आहे हे पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक चिंता होती की, आपले दुकान सुस्थितीत आहे की नाही. पण दुकानं जळून खाक झालेलं पाहून अनेकांना रडू आवरलं नाही. आता पुन्हा मार्केट कसं उभा राहील, या चिंतेत प्रत्येक कामगार असल्याचे दिसून आले.