राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचा पुढाकार

अनास्थेचा ‘ठेवा’ भाग-२

चिन्मय पाटणकर पुणे : विद्या प्राधिकरणाअंतर्गत असलेल्या दृक श्रवण शिक्षण विभागाकडे असलेल्या २६०० चित्रफितींपैकी १२०० चित्रफिती बुरशी लागून खराब झाल्यानंतर उर्वरित चित्रठेव्याचे जतन होण्याची आशा निर्माण झाली आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने उर्वरित चित्रफितींचे जतन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विद्या प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या दृक श्रवण चित्रपट विभागाकडे मौलिक चित्रठेवा आहे. त्यात शैक्षणिक अनुबोधपट, वैज्ञानिक माहितीपट अशा सुमारे २६०० चित्रफिती आहेत. त्यातील १२०० चित्रफिती खराब झाल्याने त्यांची नोंद ‘राईट ऑफ’ करण्यात आल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने उघड केला. हा चित्रठेवा महत्त्वाचा असल्याचे लक्षात आल्याने तो जपण्यासाठी विद्या प्राधिकरणाने हालचाल सुरू केली आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या माध्यमातून या चित्रठेव्याकडे लक्ष दिले जाणार आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी या बाबतची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. ‘विद्या प्राधिकरणाकडे दुर्मीळ चित्रठेव्याचा खजिना असल्याची माहिती एका संग्राहकाकडून मिळाली होती. त्यामुळे हा चित्रठेवा जतन करण्याच्या विचारातून आम्ही विद्या प्राधिकरणाशी काही महिन्यांपूर्वीच संपर्क साधला होता. मात्र, त्यांच्याकडून सुरुवातीला काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. अखेर, त्यांना पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला आहे. त्यांच्याकडे असलेला चित्रठेवा अतिशय महत्त्वाचा आहे. या चित्रठेव्याचे जतन करण्याची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय त्यासाठीचे प्रयत्न करण्यास तयार आहे. विद्या प्राधिकरणाकडे असलेल्या चित्रठेव्याची तपासणी करून त्याचे जतन, डिजिटायझेशन करण्याचे नियोजन आहे,’ असे मगदूम यांनी स्पष्ट केले.

शिक्षणमंत्री लक्ष देणार का?

दृक श्रवण शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून या संस्थेला राज्य सरकारने आवश्यक त्या सोयीसुविधाच पुरवल्या नसल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे. संस्थेकडे असलेला चित्रठेवा ‘फिल्म स्टॉक’अर्थात रिळांच्या स्वरुपातला आहे. यातल्या काही चित्रफिती ८ मिमी, काही चित्रफिती १६ मिमी प्रकारातल्या आहेत. या चित्रफिती रिळे चालवण्यासाठी आवश्यक असलेला ‘फिल्म प्रोजेक्टर’च संस्थेकडे नाही. बरीच वर्षे ही रिळे संस्थेच्या गोदामात पडून होती. त्यातल्या कित्येक रिळांना बुरशीही लागली होती. ही रिळे चांगली टिकण्यासाठी त्याला ठरावीक तापमान ठेवणारी वातानुकूलन यंत्रणा असावी लागते. यातल्या कोणत्याही सुविधा संस्थेकडे उपलब्ध नाहीत. सध्या तर ही रिळे संस्थेतील एका खोलीत उघडय़ावर ठेवण्यात आली आहेत. विद्या प्राधिकरण ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अखत्यारित असलेली संस्था आहे. २६०० पैकी १२०० चित्रफिती बुरशी लागल्याने आधीच खराब झाल्या आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे उर्वरित चित्रठेव्याचे जतन करण्यासाठीची प्रक्रिया योग्य रितीने करण्याकडे शिक्षणमंत्री लक्ष देणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दृक श्रवण शिक्षण विभागातील चित्रफिती जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची मदत घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या मदतीने कार्यवाही करण्यात येत आहे.

सुनील मगर, संचालक, विद्या प्राधिकरण