सरकारी नियमांची काटेकोर अंमलबजावणी

पुणे : बंदच्या परिस्थितीत शहरातील भटक्या कुत्र्यांवर असलेले उपासमारीचे संकट ओळखून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी डेक्कन जिमखाना परिसरातील प्राणी प्रेमी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून, परवानगीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, इतर सरकारी नियमांची अंमलबजावणी करून हे नागरिक कुत्र्यांना खायला घालत आहेत.

डॉ. सुषमा दाते म्हणाल्या, डेक्कन जिमखाना अ‍ॅनिमल वेलफेअर ग्रुपतर्फे एरंडवणे, डेक्कन जिमखाना आणि मॉडेल कॉलनी भागातील किमान ५५० भटक्या कुत्र्यांना आम्ही खायला घालत आहोत. प्राथमिक स्तरावर यासाठी आम्ही काही मदत निधी गोळा करून काम करण्यास सुरुवात केली. मदत करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी कधी थेट विक्रेत्याकडे आपली मदतीची रक्कम दिली. व्यक्ती आणि संस्थांनी या कामासाठी सहकार्य केले. शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, रेस्क्यू संस्थेच्या नेहा पंचमिया यांच्यामार्फत मोठय़ा प्रमाणात डॉग फूड आणि इतर खाद्यपदार्थाची मदत करण्यात आल्याचेही डॉ. दाते यांनी सांगितले.

मिथाली परांजपे म्हणाल्या, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, महाविद्यालयांची कँटिन अशा जागा बंद असल्यामुळे भटक्या कुत्र्यांची उपासमार होत आहे. टेकडीवर व्यायामासाठी बाहेर पडणारेही या कुत्र्यांना नियमित खायला घालत असतात. सद्यस्थितीत यातील काहीच पर्याय नसल्यामुळे आम्ही हे काम करत आहोत. पोलीस, इमारतींचे सुरक्षा रक्षक, स्वच्छचे स्वयंसेवक तसेच काही ठिकाणी महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी यांचीही या कामात मोठी मदत होत आहे. या कामात मदत किंवा सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgpspune@gmail.com वर संपर्क साधावा.

भटक्या कुत्र्यांची काळजी आवश्यक का?

भटक्या कुत्र्यांच्या आहाराची जबाबदारी घेऊन हे काम सुरू केल्यानंतर काही प्रमाणात टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. ‘बंद’चे संकट सर्वावरच असताना भटक्या कुत्र्यांची काळजी का असा प्रश्नही विचारला जातो. मात्र, रस्त्यावर वावरणारे हे कुत्रे उपाशी असतील, तर नागरिकांना, अत्यावश्यक सेवांसाठी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांनाच त्याचा त्रास होणार आहे. त्यांनी नागरिकांवर हल्ला करण्याची भीती आहे. त्यामुळे जे नागरिक हे काम करत आहेत, त्यांना त्रास देऊ नये असे आवाहन डेक्कन जिमखाना अ‍ॅनिमल वेलफेअर ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.