जुन्नरच्या बिबट निवारण केंद्रात दाखल झालेल्या जखमी मादीला जीवनदान मिळाले आहे. सदर बिबट मादी रोड अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिचे वय हे पाच महिने असून तिच्यावर फिजिओथेरपी आणि मसाजद्वारे उपचार करून तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला जंगलात सोडण्यात आले. बिबट मादीवर उपचार करून तिला जीवनदान देण्यात जुन्नरचे उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तीन महिन्यांपूर्वी अपघातग्रस्त मादी बिबटला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिच्या चारही पायांना पॅरलिसिस झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिला डॉक्टरांनी फिजिओथेरपी आणि मसाज ट्रिटमेंट सुरू केली. पहिल्या पंधरा दिवसात ती बसायला लागली, नंतर आठ दिवसात उभे राहायला लागली आणि चालायला लागली. त्यानंतरच्या आठ दिवसात ती पळायला आणि उडी मारायला लागली. तीन महिन्यात पूर्णतः मादी बिबटला बरे करण्यात डॉक्टरांना यश आले. त्यानंतर अखेर तिला जंगलात सोडण्यात आले.

दरम्यान, तिला जंगलात सोडताना संपूर्म टीमच्या संमिश्र भावना पहायला मिळाल्या. एकीकडे ती मुक्त संचार करेल याचा आनंद होता तर दुसरीकडे ती आपल्याला सोडून जाण्याचे दुःख असल्याची प्रतिक्रिया डॉ.अजय देशमुख यांनी व्यक्त केली. मादी बिबट चालावी आणि बरी व्हावी यासाठी दिवसातून तीन वेळा मसाज करणे, खाऊ घालणे, पाणी पाजणे हे सर्व करण्यात आले. तिची अगदी मुलासारखी काळजी घेतली गेली होती, असेदेखील ते म्हणाले.