राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर भिगवणमधील एका कार्यक्रमात शुक्रवारी सकाळी बुरशीनाशक औषध फेकण्यात आले. ते डोळ्यात गेल्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून, उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात आणण्यात आले आहे. पोलीसांनी बुरशीनाशक औषध फेकणाऱया दोघांना अटक केली आहे. सचिन गोपाळ मलगुंडे (वय २७), दादासाहेब माणिक थोरात (वय ३३, दोघेही रा. मदनवाडी, ता. इंदापूर) अशी त्यांची नावे आहेत.
भिगवणमधील पूर्वनियोजित कार्यक्रम संपल्यावर हर्षवर्धन पाटील आपल्या गाडीमध्ये बसले. त्यावेळी तिघेजण त्यांच्या गाडीजवळ आल्याने त्यांनी गाडीची काच खाली केली. काच खाली घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यावर हे बुरशीनाशक औषध फेकण्यात आले. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन पाटील यांच्यावर बुरशीनाशक औषध फेकल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशो बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी स्वतःच ती शाई नसून, बुरशीनाशक औषध असल्याचे सांगितले. बुरशीनाशक औषधामुळे आपल्या डोळ्याला तीव्र चुरचुर होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इंदापूर हा हर्षवर्धन पाटील यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्यावर बुरशीनाशक औषध फेकण्यात आल्याचे पडसाद इंदापूरमध्ये उमटले. इंदापूर, भिगवण या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून, कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूकही कार्यकर्त्यांनी काहीवेळ रोखून धरली होती. मात्र, पोलीसांनी हस्तक्षेप केल्यावर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. संपूर्ण इंदापूर तालुक्यात सध्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.