मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मार्गिकेची शिस्त धुडाकावणाऱ्या (लेनकटिंग) वाहनचालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कारवाई तीव्र केली असली तरी ‘लेनकटिंग’चे नियम धाब्यावर बसवून सुसाट वाहने हाकण्याचे प्रकार कायम आहेत.

खासगी प्रवासी बसच्या धडकेने रविवारी रात्री पुण्यातील प्रसिद्ध मणकाविकारतज्ज्ञ डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (वय ४४) यांच्यासह त्यांच्या मोटार चालकाचा ज्ञानेश्वर विलास भोसले मृत्यू झाला आणि हा अपघात चालकाने मार्गिकेची शिस्त धुडकावल्यामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. द्रुतगती मार्गावर किवळे परिसरात झालेल्या अपघातात डॉ. जयेश पवार व डॉ. प्रमोद भिलारे जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर महामार्ग पोलिसांनी ‘लेनकटिंग’ करणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाई गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र केली आहे. महामार्ग पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला असला तरी या कारवाईचा परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नियम धुडाकावण्याच्या या वृत्तीमुळे द्रुतगती मार्गावर सामान्यांचे बळी जात असल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी द्रुतगती मार्ग वाहनचालकांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा ठरला होता. महामार्ग पोलीस व रस्ते विकास महामंडळाने केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश आले असले तरी मार्गिकेची शिस्त न पाळण्याचे प्रमाण मोठे आहे.

द्रुतगती मार्गाच्या निर्मितीला २० वर्ष झाली आहेत. मात्र, या मार्गावरील समस्या कायम आहेत. देशातील पहिला द्रुतगती मार्ग अशी ओळख असलेल्या या मार्गावर सुविधांचा अभाव आहे. वाहन नादुरुस्त झाल्यास तत्काळ वाहन बाजूला नेण्याची सुविधा मार्गावर नाही. जवळपास वाहनतळदेखील उपलब्ध नाही. २० वर्षांनंतर द्रुतगती मार्गावर आपत्कालीन मदत केंद्र (ट्रॉमा सेंटर) सुरू झाले असले तरी तेथे जाण्यास रस्ता योग्य नाही. ट्रॉमा सेंटर अपूर्ण अवस्थेत आहे.

‘केतनने माणसे कमावली’

वैद्यकीय व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कोणाचेही असते तसे स्वत:चे रुग्णालय असावे हे केतन याचे स्वप्न होते, पण आपल्या घरातला एक अशी वागणूक देणारे डॉ. के. एच. संचेती आणि डॉ. पराग संचेती यांनी त्याला सोडले नाही. अधिकाधिक रुग्णांना सेवा देता यावी यासाठी हेलिकॉप्टर घेऊन प्रवास करण्याची त्याची मनीषा होती, पण एका दुर्दैवी अपघाताने त्याचे हे स्वप्न विरून गेले. रुग्णसेवेमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या केतनने पैसे नाही तर असंख्य माणसे कमावली, अशी भावना व्यक्त करत ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. श्रीपाद खुर्जेकर यांनी आपल्या डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणारा केतन अनेकदा गाडीतून उतरून इतरांनाही वाहतुकीच्या नियमांची आठवण करून द्यायचा. ‘बाबा, मोटारीमध्ये मागच्या सिटवर बसत असलात तरी सिट बेल्ट लावा’, असे तो मला नेहमी आवर्जून सांगायचा, असेही ते म्हणाले.

पंधरा दिवसात पाच हजारजणांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन, मार्गिकेची शिस्त मोडणे तसेच सुविधांच्या अभावामुळे द्रुतगती मार्गावर निष्पापांचे बळी जात आहेत. गेल्या पंधरा दिवसात द्रुतगती मार्गावर मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या ५ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असली तरी नियम धुडकावण्याचे प्रकार कायम आहेत. तसेच कारवाईनंतरही वाहनचालकांची मुजोरी कायम आहे.

बसचालक अटकेत

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी रात्री डॉ. केतन खुर्जेकर यांच्या मोटारीस धडक दिल्यानंतर पसार झालेल्या बसचालकाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अब्दुल कादर फकीर अहमद (वय ४४, रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. खासगी प्रवासी बस मुंबईहून बंगळूरुकडे जात होती. ही बस कर्नाटकातील असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. अपघात झाल्यानंतर बसचालक घटनास्थळी न थांबता प्रवाशांना सोडून पसार झाला. तळेगाव पोलिसांनी पसार झालेल्या चालकाचा शोध घेऊन मंगळवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. त्याला १८ सप्टेंबरला न्यायालयात हजर करणार असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले.

उत्तम डॉक्टर, सच्चा माणूस

संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती म्हणाले, डॉ. खुर्जेकर हे मला लहान भावासारखे होते. त्यांच्या जाण्याने वैयक्तिकरित्या माझी तसेच वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ.खुर्जेकर यांनी आतापर्यंत दहा हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या होत्या आणि गरजू रुग्णांना आपल्या कौशल्याद्वारे बरे केले होते. त्यांच्या निधनामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.