पिंपळे गुरवमधील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
ते आले, त्यांनी मोटारीचा अलगद ताबा घेतला आणि अवघ्या आठ मिनिटांमध्ये घराशेजारी पार्क केलेली ‘टोयाटो इनोव्हा’ मोटार गायब केली. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने पिंपळे गुरव येथे झालेली चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या चित्रीकरणाचा आधार घेत पोलीस चोरांच्या शोधात आहेत.
पिंपळे गुरव येथील पवनानगरच्या गल्ली क्रमांक तीन येथे ‘मातृछाया’ नावाचा बंगला आहे, तेथे रावडे परिवाराचे वास्तव्य आहे. एका बाजूला मोटारीसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास तीन अज्ञात चोरटय़ांनी तेथे प्रवेश केला.
पहिल्याने पाहणी केली, त्यानंतर दुसऱ्याचा प्रवेश झाला. त्याने मोटारीचा दरवाजा उघडला आणि मोटार बाहेर काढली. खबरदारी घेत तिसऱ्याने बाहेर पडताना त्याला मदत केली. अतिशय सफाईदार पद्धतीने या तिघांनी मोटारीचा ताबा घेतला आणि अवघ्या आठ मिनिटांमध्ये मोटार गायब केली. बंगल्यामध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरीचा हा प्रकार अतिशय स्पष्टपणे चित्रीत झाला आहे.

नगरसेवकाला ‘झटका’
काळेवाडी-रहाटणी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कैलास थोपटे यांचीही ‘इनोव्हा’ मोटार काही दिवसांपूर्वी चोरीला गेली आहे. त्याचाही अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. दुरुस्तीनंतरच मोटार चोरीला गेली होती, असे थोपटे यांनी स्पष्ट केले आहे.