धरणे सुरक्षित असल्याचा जलसंपदाचा दावा

पुणे : पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी करणे आवश्यक असून त्यानुसार जलसंपदा विभागाने जिल्ह्य़ातील सर्व धरणांची तपासणी केली. सर्व धरणे सुरक्षित असल्याचा दावा या विभागाकडून करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्य़ाच्या परिसरात धरणांचे जाळे आहे. जिल्ह्य़ात पाच प्रमुख नद्या आहेत आणि त्यांच्या पाण्यावर तब्बल २५ धरणे आहेत. त्यातून पुणेकरांची तहान भागवली जाते आणि जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी दिले जाते. पुण्यातून वाहणारी मुठा, पिंपरी-चिंचवडमधून जाणारी मुळा या प्रमुख नद्यांबरोबरच घोड, भीमा आणि निरा या नद्यांचे पाणी साठवण्यासाठी ठिकठिकाणी धरणे बांधली आहेत. गळती सुरू झाल्याने टेमघर धरणाचे काम करण्यात येत आहे.  वडिवळे आणि डिंभे तसेच वरसगाव धरणाची गळती रोखण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून गेल्याच वर्षी स्पष्ट करण्यात आले आहे.  धरणांच्या पावसाळ्यापूर्वी करायच्या आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्या असून सर्व धरणे सुरक्षित आहेत, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

धरणांची दरवर्षी नियमित तपासणी जलसंपदा विभागाकडून करण्यात येते. सर्व धरणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये धोकादायक पद्धतीने गळती किंवा धरणाला धोका असल्याचे निदर्शनास आलेले नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. मुठा नदीवर टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही धरणे आहेत. मुळेच्या परिसरात पवना, कासारसाई धरणे आहेत. घोड नदीवरील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड आणि विसापूर ही सात धरणे आहेत. भीमा नदीचे पाणी कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे आणि आंद्रा या पाच धरणांच्या माध्यमातून साठवले जाते. तर, निरा नदीच्या पाण्यावर निरा देवघर, गुंजवणी, भाटघर, वीर आणि नाझरे ही धरणे बांधली आहेत.

धरणांची तपासणी कशी होते?

पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत धरणांची तपासणी होते. त्यानंतर पावसाळ्यानंतरही तपासणी होते. ही तपासणी म्हणजेच धरणांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावे लागते. या अहवालावरच धरणांतील पाणीसाठय़ाचे नियोजन केले जाते. जलसंपदाकडील धरण सुरक्षा संस्था नावाच्या विभागाकडे धरणांची यादी असते. त्यानुसार दरवर्षी ते ठरावीक धरणांची तपासणी करतात. तीन वर्षांतून एकदा तरी तपासणी करण्याचे नियोजन असते. तपासणी करताना प्रामुख्याने धरणातील गळती मोजणे, सांडवा, धरणाचे वरील आणि खालील पिचिंग, दरवाजे कार्यरत आहेत किंवा कसे, देखभाल-दुरुस्ती आणि याबाबत केलेल्या नोंदीनुसार कामे झाली आहेत किंवा कसे, वीजपुरवठा, जनरेटरची सुविधा अशा विविध घटकांची तपासणी होते.