गेली तीन वर्षे ३० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जागा रिक्त असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या गुणवत्तेची पाहणी करण्याचा निर्णय तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला असून राज्यातील नव्वद महाविद्यालयांची पाहणी करण्यात येणार आहे.
गेली दोन-तीन वर्षे राज्यातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मात्र, त्याचवेळी काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत. यावर्षीही राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे राज्यातील ९० महाविद्यालयांमध्ये सलग तीन वर्षे ३० टक्के किंवा त्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. या महाविद्यालयांची गुणवत्ता तपासण्याचा निर्णय राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.
महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत का, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या योग्य आहे का, अशा बाबींची पाहणी या महाविद्यालयांना अकस्मात भेटी देऊन करण्यात येत आहे. यासाठी संचालनालयाकडून स्वतंत्र समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.