प्रथमेश गोडबोले prathamesh.godbole@expressindia.com

जळगाव येथे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीनिमित्त पुण्याला आलेल्या विशाल राणे या युवकाने ज्ञाना प्रॉडक्ट्स फर्मची स्थापना केली. भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे द्रवपदार्थ (लिक्विड) विशाल यांनी स्वत: संशोधन, अभ्यास करून तयार केले आहे. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्य़ात आणि जळगावमध्येही फर्मचे उत्पादन पोहोचले आहे. एकहाती घरगुती स्वरूपात असलेला व्यवसाय विस्तारण्याचे आणि त्याकरिता विपणनावर भर देण्याचे उद्दिष्ट विशाल यांनी ठेवले आहे.

विशाल राणे मूळचे जळगावचे. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (बीसीए) ही पदवी त्यांनी संपादन केली. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने त्यांनी पुणे गाठले. व्यवसायाची आवड असलेल्या विशाल यांनी शिक्षण घेत असतानाच व्यवसाय करायचा हे मनाशी पक्के केले. परंतु, पदवी संपादन केल्यानंतर व्यवसाय सुरू करणे शक्य नसल्याने त्यांनी पुण्यातील एका खासगी कंपनीमध्ये काही वर्षे नोकरी केली. विवाह झाल्यानंतर आणि नोकरीमध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर व्यवसाय सुरू करण्याचे विचार त्यांच्या मनात आले. मात्र, कोणता व्यवसाय करायचा, याबाबत निश्चिती होत नव्हती. त्यांच्या सासऱ्यांनी भांडी स्वच्छ करण्याची पावडर किंवा द्रवपदार्थ तयार करण्याची कल्पना दिली. ही कल्पना पसंत पडल्यानंतर विशाल यांनी स्वत: भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारी विविध उत्पादने, संबंधित कंपन्या, बाजारपेठ यांचा अभ्यास केला. उत्पादन तयार केल्यानंतर ते कुठे-कुठे विक्रीसाठी ठेवता येईल, याबाबतचे निष्कर्ष काढल्यानंतर विशाल यांनी भांडी धुण्यासाठी लागणारा द्रवपदार्थ तयार करण्याचे त्यांनी निश्चित केले आणि ज्ञाना प्रॉडक्ट्स नावाने फर्मची स्थापना केली. फर्मच्या उत्पादनाला त्यांनी व्ही. एन. प्रॉडक्ट्स असे नाव दिले आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट विशाल यांच्यासमोर होते. भांडवल, विपणन, जाहिरात यांकरिता पैशांची चणचण असल्याने त्यांनी मित्र, नातेवाईक, ओळखीच्या लोकांना फर्मची उत्पादने वापरण्यास दिली. उत्पादनाची गुणवत्ता आणि चांगला परिणाम दिसत असल्याने मित्र, नातेवाईक यांच्याकडूनच उत्पादनाला मागणी सुरू झाली.

‘मूळचा जळगावचा असल्याने पुणे माझ्यासाठी नवे शहर होते. शिक्षणानंतर थेट नोकरीसाठीच पुण्यात आलो असल्याने स्थानिक नागरिकांशी, त्यांच्या आवडीनिवडीबाबत फारसा संबंध नव्हता. तर, फर्मचे उत्पादन स्वयंपाकघराशी निगडित असल्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचणे मोठे जिकिरीचे काम होते. मात्र, खचून न जाता कुटुंबीयांच्या मदतीने नातेवाईक, मित्रमंडळी, नोकरीच्या ठिकाणचे सहकारी यांना उत्पादन वापरण्यासाठी दिले. त्यांच्याकडून उत्पादनाबाबत चांगले परिणाम येत असल्याचे समजल्यानंतर काम करण्यासाठी हुरूप आला. भांडी धुतल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या पावडर, द्रवपदार्थ किंवा साबणामुळे भांडय़ांवर डाग पडतात, असे निरीक्षण समोर आले होते. त्यामुळे उत्पादन तयार करताना याबाबत काळजी घेण्यात आली असून फर्मच्या द्रवपदार्थामुळे भांडय़ांना डाग पडत नाहीत. तसेच भांडी घासताना हातांना इजाही होत नाही’, असे विशाल सांगतात.

उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी वेगळा खर्च करण्यापेक्षा विशाल यांनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या समाजमाध्यमांतून उत्पादनाचा प्रचार व प्रसार केला. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत त्यांना सहज पोहोचता आले. आकुर्डी येथे राहणारे विशाल घरीच उत्पादन तयार करतात. आतापर्यंत विशाल यांना घरगुती स्वरूपातच मागणी असून एकदम पाच-दहा लिटर अशी मागणीदेखील ग्राहकांकडून येते. आतापर्यंत आकुर्डी, सांगवी, हडपसर, चाकण, तळेगाव, पुणे शहर आणि विशाल यांचे मूळ गाव असलेल्या जळगाव येथे फर्मचे उत्पादन पोहोचले आहे. बाजारातून कच्चा माल आणल्यानंतर त्याचे एकत्रीकरण करून उत्पादन तयार केले जाते. त्याकरिता कोणत्याही प्रकारचे यंत्र नसून विशाल घरीच कच्च्या मालापासून द्रवपदार्थ तयार करतात. हा द्रवपदार्थ तयार करण्यासाठी दीड ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. उत्पादन तयार झाल्यानंतर पाचशे मिलीलिटरच्या पिशव्यांची (पाऊच) मागणीनुसार विक्री केली जाते.

‘उत्पादनाची किंमतही चाळीस रुपयांपासून आहे. सर्वसामान्य नागरिकांना सहज वापरण्यासाठी बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत किंमत कमी ठेवण्याकडे माझा कल आहे. तसेच बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा असून ठराविक काळानंतर ग्राहकांच्या मागणीत, उत्पादनांमध्ये बदल होत आहेत. हे बदल स्वीकारून फर्मच्या उत्पादनामध्ये आवश्यक बदल करत आहे. द्रवपदार्थाला चांगला वास, फ्लेवर, रंग यामध्येही बदल करण्यात येतो. एकहाती व्यवसाय असल्याने मी स्वत: मागणी आल्यानंतर घरपोच उत्पादन पोहोचवतो. आगामी काळात विपणनावर भर देण्यात येणार असून पुणे, जळगावसह इतर शहरांमध्येही उत्पादने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे विशाल यांनी सांगितले.