‘‘संयुक्त राष्ट्रांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात २०२५ पर्यंत जगातील २५ टक्के व्यक्तींना कोणता ना कोणता मेंदूशी संबंधित आजार असेल असे दिसून आले आहे. मेंदूशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींची संख्या ज्या पद्धतीने वाढते आहे, त्या तुलनेत त्यांच्यासाठी असलेल्या शाळा आणि निवासी संस्थांची संख्या नगण्य आहे. विशेष मुलांनाही चांगले जगण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणून सध्याच्या व्यवस्थेला धक्का देण्याची गरज आहे,’’ असे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
सुजाता व अरुण लोहोकरे यांनी लिहिलेल्या व सुविद्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ या पुस्तकाचे सोमवारी डॉ. अवचट यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोहोकरे दांपत्याने आपली विशेष मुलगी सई हिला वाढवताना आलेले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. निवांत अंध विद्यालयाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचेही या वेळी प्रकाशन करण्यात आले.
‘विशेष मुलांच्या पालकांनी इतरांना आपल्याविषयी काय वाटते, याचा विचार करून स्वत:ची कीव करून घेणे चुकीचे असून पालकांच्या अशा वागण्याचे पडसाद त्या विशेष मुलावरही उमटतात,’ असे गोडबोले यांनी सांगितले.  
आपली मुलगी यशोदा हिला एपिलेप्सी हा आजार असल्याचे कळल्यावर तसेच पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांना कर्करोग झाल्यानंतर हे धक्के आपल्या कुटुंबाने सकारात्मक पद्धतीने कसे पचवले, याबद्दलच्या आठवणी अवचट यांनी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘आपल्या मुलाला ठरावीक गोष्टी येत नाहीत म्हणून तो टाकाऊ, ही वृत्ती आजच्या ‘टाकाऊ ते कचऱ्यात टाका’ प्रकारच्या जीवनशैलीतून आली आहे. आपत्ती आपल्याकडून कसलेही शुल्क न घेता आपल्याला शिकवत असते, त्यामुळे तिचा द्वेष न करता आनंदी आणि स्पर्धामुक्त वृत्तीने तिचा स्वीकार करायला हवा. विशेष मुलांच्या पालकांनी आणि सहानुभूती बाळगणाऱ्यांनीही स्वत:च कार्यकर्ता होऊन या समस्यांविषयी चळवळ उभारायला हवी.’’