राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शैक्षणिक संवाद राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे आकलन तपासण्यासाठीचा ‘स्वाध्याय’ (डिजिटल होम असेसमेंट) उपक्रम अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवून त्यांना उपक्रमात सामावून घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि लिडरशिप फॉर इक्विटी यांच्यातर्फे  ‘स्वाध्याय’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यावर या उपक्रमातून भर दिला जाणार आहे. उपक्रमांतर्गत दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील दहा आणि भाषेतील दहा प्रश्न सरावासाठी पाठवले जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने सराव करण्यासाठी वेळ असेल, विद्यार्थ्यांने प्रश्नांची उत्तरे पाठवल्यावर त्याची कामगिरी लगेचच त्याला कळवली जाईल, विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कामगिरी समजण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना अभ्यास, सरावासाठी मदत हवी असल्यास त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून शिक्षक चांगल्या पद्धतीने उपाययोजना करू शकतील.

स्वाध्याय मिळवण्यासाठी..

स्वाध्याय उपक्रमाद्वारे स्वाध्याय मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाद्वारे संदेश पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी  पुणे विभागासाठी ८५९५५२४५१९ ,अमरावती आणि नागपूर विभागासाठी ८५९५५२४५१५, औरंगाबाद विभागासाठी ८५९५५२४५१६, नाशिक विभागासाठी ८५९५५२४५१७ आणि कोकण विभागासाठी ८५९५५२४५१८  हे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.