पुण्यातील ७० टक्के वैद्यकीय विम्याचे ग्राहक सार्वजनिक विमा कंपन्यांकडे असूनही या कंपन्यांच्या ‘कॅशलेस’च्या यादीत केवळ ४१ रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णांनी या यादीतील रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यास त्यांना कोणतीच अडचण येणार नाही, असा दावा करत पुण्यात कॅशलेसची काहीच समस्या नसल्याचे विमा कंपन्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील रुग्णालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे भांडण सुरू होऊन रुग्णालयांनी ‘कॅशलेस’ (विना रक्कम) वैद्यकीय सेवा बंद केल्याला आता तीन महिने लोटले आहेत. अजूनही कॅशलेसच्या समस्येवर काहीही तोडगा निघाला नसून वैद्यकीय सेवा घेण्याची वेळ येणाऱ्या रुग्णांचे हाल कायम आहेत. कॅशलेस सेवेसाठी विमा कंपन्यांनी ठरवून दिलेले दर परवडत नसल्याचे सांगत १ डिसेंबरपासून लहान रुग्णालयांनी कॅशलेस सेवा पुरवणे बंद केले होते, तर मोठय़ा रुग्णालयांनी फक्त कॉर्पोरेट ग्राहकांना कॅशलेस सेवा पुरवण्याची भूमिका घेऊन किरकोळ ग्राहकांची कॅशलेस सेवा बंद केली होती. त्यानंतर पुण्यातील दहा मोठय़ा रुग्णालयांना विमा कंपन्यांनी काही अटींसह २१ टक्क्य़ांची दरवाढ देऊ केली होती. या रुग्णालयांशी झालेल्या वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्या असून ती लवकरच कॅशलेसच्या यादीत येतील, असेही विमा कंपन्यांकडून सांगण्यात येत होते. विमा ग्राहकांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल असे वाटत असताना याबाबतची मोठय़ा रुग्णालयांकडून अजून काहीही निर्णय झालेला नाही.
दुसरीकडे कॅशलेसची काहीही समस्या पुण्यात सुरू असल्याचे मान्य करण्यास विमा कंपन्या तयारच नाहीत. नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे उपमहाव्यवस्थापक एन. बनचुर म्हणाले, ‘‘शहरातील सर्व रुग्णालये कॅशलेसच्या यादीत येणे शक्य नाही. काही रुग्णालये कायम बाहेर राहणार. जी रुग्णालये वाजवी दरात चांगली सेवा पुरवण्यास तयार आहेत, ती आमच्या यादीत आहेत. ज्या रुग्णालयांना या माध्यमातून केवळ पैसे कमवायचे आहेत ती यादीत नाहीत. रुग्णांनी यादीत असलेल्या रुग्णालयांमध्ये जावे.’’
वैद्यकीय विमा घेणाऱ्या ग्राहकांमध्ये ६० ते ७० टक्के ग्राहक हे न्यू इंडिया अॅश्युरन्स, नॅशनल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स आणि ओरिएंटल इन्शुरन्स या चार ‘जिप्सा’ विमा कंपन्यांकडे आहेत. यात सर्वाधिक ग्राहक न्यू इंडिया अश्युरन्सकडे आहेत. असे असताना विमा कंपन्यांच्या सध्याच्या कॅशलेस सेवेच्या यादीत केवळ ४१ रुग्णालयांची नावे आहेत. त्यातलीही सर्व रुग्णालये कॅशलेस सेवा पुरवत नसल्याचे ‘लोकसत्ता’ने यापूर्वीही समोर आणले होते.
अत्यावश्यक सेवेच्या वेळीही कटकटच!
आणीबाणीच्या वेळी रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस सेवा घेता यावी, त्यासाठी रुग्णालय विमा कंपनीच्या पीपीएन यादीत असणे गरजेचे नाही, असे ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’चे निर्देश आहेत. परंतु हे पाळले जातेच असे नाही असे काही लहान रुग्णालयांनी सांगितले. ‘‘पुण्यात विमा कंपन्यांचे एकूण २४ ‘टीपीए’ (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर) कार्यरत आहेत. अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यावर रुग्ण कॅशलेसची यादी न पाहता जवळच्या रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे रुग्णाचा ‘टीपीए’ रुग्णालयाकडे असतोच असे नाही. अशा वेळी रुग्णालयाकडून संबंधित टीपीएला रुग्णाला अत्यावश्यक सेवेची गरज असल्याबाबत कळवले जाते. पण प्रत्येक वेळी रुग्णाला त्या रुग्णालयात कॅशलेस सेवा मिळणे ‘टीपीए’ मान्य करत नाहीत,’’ अशी माहिती एका रुग्णालयाच्या प्रमुखाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.