शहरात विविध ठिकाणी इच्छुक उमेदवारांकडून ‘बोर्डबाजी’
महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांकडून वातावरण निर्मितीसाठी दिसेल त्या मोकळ्या जागी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, भारतीय लष्कराचा यशस्वी लक्ष्यभेद आणि दिवाळी अशा सण, घटनांचे निमित्त साधत हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. निवडणुकांच्या तयारीचा एक भाग म्हणून आपापल्या प्रभागाबरोबरच शहरातील महत्त्वाच्या चौकात पक्षांच्या नेत्यांबरोबर सणांसाठीच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स आणि कमानीही उभारण्यात आल्या असून त्यामुळे सारे शहरच विद्रूप झाले आहे.

पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, औंध गावातील ब्रेमेन चौक, विद्यापीठ चौक, लष्कर, लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ आदी विविध भागांमध्ये इच्छुकांनी शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावले आहेत. नवरात्रानिमित्त महिलांना अष्टविनायक दर्शन, पुण्यातील नऊ देवींचे दर्शन, गौरी सजावट स्पर्धा, दांडिया अशा विविध कार्यक्रमांमधून पारितोषिकांची, सहलींची लयलूट करीत इच्छुकांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

या सर्व कार्यक्रमांची जाहिरात आपापल्या प्रभागात इच्छुकांकडून केली जात असून त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर फ्लेक्स लावले जात आहेत.

फलकबाजी रोखण्यासाठीच्या समित्या कागदावरच

पुणे : शहरात विनापरवाना उभारण्यात आलेल्या फ्लेक्स आणि होर्डिगवर कारवाई व्हावी, फ्लेक्स-होर्डिग्ज् उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा, यासाठी शहरातील नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रक्रिया सुरु आहे.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने अनधकिृत फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिगना आळा घालण्यासाठी समिती स्थापन करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या समित्या फक्त कागदावरच स्थापन झाल्या आहेत. शहरात मोठय़ा प्रमाणावर विनापरवाना फ्लेक्स उभारण्यात येत असल्यामुळे कनिझ सुखरानी आणि आशिष माने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरु आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणी दरम्यान बेकायदेशीर फलक, होर्डिगवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने आयुक्तांना दिले आहेत. तर अन्य एका याचिकेदरम्यान दर महिन्याला कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडून किरकोळ स्वरुपात कारवाई होत असली तरी मोठय़ा राजकीय दबावालाही प्रशासनाला बळी पडावे लागत आहे.

फ्लेक्स, होर्डिग्ज काढण्यासाठी ठेकेदार नको

शहरात उभारण्यात आलेले फ्लेक्स, होर्डिग, बॅनर्स काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येते. त्यासाठी पुणेकरांनी कररूपाने दिलेले पैसे मोजले जातात. निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर ठेकेदाराकडून कारवाईला सुरुवात होते. मात्र दरम्यानच्या काळात फ्लेक्स, होर्डिग, बॅनर्सच्या माध्यमातून तोपर्यंत फुकटची जाहिरातही झालेली असते. त्यामुळे त्याचा आर्थिक भारही महापालिकेलाच सहन करावा लागत असून जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे विना परवाना फ्लेक्स, होर्डिग, बॅनर्स लावणाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर दंड वसूल करावा, अशी मागणीही कनिझ सुखरानी आणि आशिष माने यांनी याचिकेत केली आहे.

‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले..

१) कोंढवा येथील ज्योती चौकातील बसथांब्यावरच दोन मोठे फ्लेक्स लावले आहेत.

२) लष्कर भागातील कोहिनूर कॅफेसमोरील मुख्य रस्त्यावर (मेन स्ट्रीट) सीसीटीव्हीच्या खांबाला फ्लेक्स लावला आहे.

३) रास्ता पेठेतील समर्थ पोलिस ठाण्याच्या शेजारील बसथांब्यावर एका राजकीय पक्षातर्फे ‘गौरी सजावट स्पर्धे’चा फ्लेक्स लावण्यात आला आहे.

४) नाना पेठेत पिंपरी – चिंचवड येथील स्थानिक नेत्यांचे फ्लेक्स ‘आमचे मार्गदर्शक’ म्हणून लावण्यात आले आहेत.

५) केईएम रुग्णालय मुख्य फाटकासमोरील बसथांब्यावर फ्लेक्स उभारण्यात आला आहे.

६) मासे आळी पुतळ्याजवळ नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांच्या नियोजनाचा फ्लेक्स लावण्यात आला असून त्यावर विद्यमान नगसेविका झळकत आहे.

७) अपोलो चित्रपटगृहासमोरील चौकात चारही बाजूंनी विविध पक्षांनी दसरा, ओंकारेश्वर मंदिर वर्धापन दिन, नवरात्र आदींचे औचित्य साधून फ्लेक्स उभारले आहेत.