सत्ताधारी पक्षात असून प्रभागातील कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत व सांगितलेले काम करत नाहीत, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून, नागरिकांना सामोरे जाणे अवघड झाले आहे, यासारख्या तीव्र भावना भाजप नगरसेवकांनी पक्षबैठकीत व्यक्त केल्या. त्याचा परिणाम म्हणून सत्ताधारी नेत्यांनी शुक्रवारी क्षेत्रीय कार्यालयात बैठका घेत विकासकामांचा आढावा घेतला.

पिंपरी पालिकेची जानेवारी महिन्यातील सभा शनिवारी (२० जानेवारी) होत आहे. त्या सभेतील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यालयात महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नगरसेवकांची बैठक होती. जवळपास ५० नगरसेवक उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त केली. पाणीपुरवठा, सांडपाणी, अस्वच्छता, शास्तिकर, अनधिकृत बांधकामे आदी विषयांवरील तक्रारी त्यांनी मांडल्या. अधिकारी काम करत नाहीत, प्रभागातील कामे होत नाहीत. शास्तिकर तसेच अनधिकृत बांधकामांच्या विषयावरून नागरिकांमध्ये नाराजी आहे. शहरातील     कामे होत नाहीत, अधिकारी ऐकत नाहीत, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन अनेक भागांत विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही त्यामध्ये सुधारणा होत नाही. अनेक भागांत अस्वच्छता आहे. पालिकेत नेमके काय चालले आहे, कळत नाही. विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे सातत्याने आरोप होत आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. मात्र त्याविषयीचे स्पष्टीकरण पक्षाकडून दिले जात नाही. नागरिक आमच्याकडे विचारणा करत असतात, त्याची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. निवडणूक काळात खूप आश्वासने दिली, त्यादृष्टीने कामे होताना दिसत नाहीत, पालिकेच्या कार्यक्रमांमध्ये नियोजन दिसून येत नाही, अशा विविध मुद्दय़ांवर सदस्यांनी तीव्र भावना मांडल्या. बाबू नायर, संदीप वाघेरे, तुषार कामठे, अभिषेक बारणे, अंबरनाथ कांबळे, माउली थोरात, केशव घोळवे, मोरेश्वर शेडगे आदींनी विविध मुद्दे मांडले. त्याचा परिणाम शुक्रवारी दिसून आल्याचे सांगण्यात येते. सत्ताधारी नेत्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय कार्यालयांच्या बैठका घेतल्या व त्या त्या भागातील विकासकामांचा आढावा घेतला. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.