19 November 2017

News Flash

जुन्या वस्तूंचे मोल जाणून घेण्यासाठी पुणेकरांचा उत्साह

या दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी संग्रहालयांच्या विशेष सफरींचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिनिधी, पुणे | Updated: May 19, 2017 4:18 AM

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने राजा दिनकर केळकर संग्रहालयात खास लहान मुलांसाठी संग्रहालय भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा; पुण्यात संग्रहालय सफरींचे आयोजन

कुठे अगदी जुन्या धातूच्या वस्तू, कुठे जुनी नाणी आणि जुनी, मौल्यवान कागदपत्रेही..! प्राचीन वस्तूंचे मोल जाणून घेत आणि त्या वस्तूंशी जोडल्या गेलेल्या ऐतिहासिक वारशाची उजळणी करत पुणेकरांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन उत्साहात साजरा केला, आणि तब्बल ३६ संग्रहालयांचे शहर म्हणून तयार झालेली पुण्याची नवी ओळखही सार्थ ठरवली.

या दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी संग्रहालयांच्या विशेष सफरींचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती बापट रस्त्यावर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या प्रांगणात भरलेले बारा संग्रहालयांचे प्रदर्शनही गर्दी खेचत असून पालक लहान मुलांना आवर्जून हा वारसा दाखवण्यासाठी घेऊन जात आहेत. राज्याच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलुरकर व सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या उपस्थितीत गुरुवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन २० मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात ते सर्वासाठी विनामूल्य खुले राहणार असून पुण्यातील उत्तमोत्तम संग्रहालयांची दालने त्यात आहेत. संग्रहालयाशी संबंधित छायाचित्रे, वस्तू व स्मरणचिन्हे या ठिकाणी विक्रीस देखील ठेवण्यात आली आहेत.

साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे गुरुवारी खास लहान मुलांसाठी राजा दिनकर केळकर संग्रहालय भेटीचे आयोजन करण्यात आले होते. संग्रहालयाचे व्यवस्थापक सुधन्वा रानडे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, शिल्पकार विवेक खटावकर, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा या वेळी उपस्थित होते. कसबा संस्कार केंद्र आणि पन्नास लहान मुलामुलींनी संग्रहालयास भेट दिली. देशात अनेक ठिकाणी आणि खेडोपाडी फिरून दिनकर केळकर यांनी केवळ छंदापोटी ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तू जमा केल्या. या ठेव्याचे महत्त्व बलकवडे यांनी उलगडून सांगितले.

First Published on May 19, 2017 4:08 am

Web Title: international museum day celebrations