उद्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. एकेकाळी सायकलींचे आणि नंतरच्या काळात सेवानिवृत्तांचे म्हणजेच पेन्शनरांचे शहर ही पुण्याची ओळख. गेल्या काही वर्षांत आशिया खंडातील सर्वाधिक दुचाकी असलेले पुणे हे एकमेव शहर आहे. शंभराच्या आसपास पोहोचलेली छोटय़ा-मोठय़ा उद्यानांची संख्या हे वैशिष्टय़ असलेल्या पुण्याला आता संग्रहालयांचे शहर हा नवा लौकिक प्राप्त होत आहे. विविध दुर्मीळ वस्तूंचा संग्रह असलेली किमान ३६ हून अधिक संग्रहालये पुण्यामध्ये आहेत.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन गुरुवारी (१८ मे) साजरा होत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील वस्तूंचा संग्रह असलेली ३६ संग्रहालये हे वैशिष्टय़ पुण्याच्या लौकिकामध्ये भर टाकणारे ठरले आहे. पुण्यातील ऐतिहासिक वारसा आणि त्याचे महत्त्व याविषयी युवा पिढीमध्ये कुतूहल जागृत व्हावे या उद्देशातून शहरातील १२ संग्रहालये एकत्र येऊन चक्क संग्रहालयांचे प्रदर्शन भरविणार आहेत. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाचे औचित्य साधून गुरुवारपासून तीन दिवस सिंबायोसिस संस्थेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रांगणात हे अनोखे संमेलन भरविण्यात येत आहे. पुणेकरांसाठी हे      प्रदर्शन खुले असून त्यांना शहरातील विविध संग्रहालयांची माहिती एका छताखाली मिळणार आहे.

राजा दिनकर केळकर संग्रहालय, सिंबायोसिस संस्थेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, आफ्रो एशियन कल्चरल म्युझियम, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, जोशींचे रेल्वे प्रतिकृती संग्रहालय, ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे क्रिकेट खेळाचे संग्रहालय, आर्य नागार्जुन वस्तुसंग्रहालय, डेक्कन कॉलेजचा पुरातत्त्व विभाग, आदिवासी संग्रहालय, दर्शन संग्रहालय आणि सुभेदार धर्माजी खांबे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय अशी शहरातील १२ संग्रहालये या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र आली आहेत. सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार आणि केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर लोकांमध्ये कुतूहल जागृत होईल आणि मग ते प्रत्यक्ष संग्रहालयाला भेट देऊन आपल्या ठेव्याचे जतन करण्याविषयी सजग राहतील हा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुरातत्त्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर या वेळी उपस्थित राहणार असून पुण्यातील संग्रहालयांची एकत्रित माहिती देणाऱ्या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी होणार आहे. तीन दिवस सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळात खुले असणाऱ्या या प्रदर्शनात संग्रहालयाशी संबंधित छायाचित्रे, वस्तू आणि स्मरणचिन्हे विक्रीसाठी उपलब्ध असतील.

संग्रहालयांना बसथांब्याचे नाव द्यावे

शहरातील दुर्मीळ संग्रहालयांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ने त्या परिसरातील बसथांब्यांना संग्रहालयाचे नाव द्यावे. त्यामुळे तरी लोक कुतूहलातून संग्रहालयाकडे वळतील, अशी मागणी जोशी रेल्वे प्रतिकृती संग्रहालयाचे रवी जोशी यांनी केली. पुणे दर्शनच्या बसमधून केवळ तीन ते चार संग्रहालये दाखविण्यात येतात. प्रत्येक संग्रहालयासाठी केवळ १५ मिनिटांचा कालावधी दिला जातो. त्यामुळे पर्यटकांना त्या संग्रहालयातील वस्तू नीटपणे पाहता येत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी संग्रहालयांसाठी स्वतंत्र सहल आयोजित करण्याबरोबरच महापालिकेच्या वारसा वास्तू विभागाने (हेरिटेज सेल) संग्रहालयांसाठी हेरिटेज वॉक सुरू करावा, अशी मागणी जोशी यांनी केली.