महापालिकेचे सर्व ठराव कागदावरच

पुणे : सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीबाबत महापालिकेकडून कमालीची अनास्था दाखवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेत एकूण नगरसेवकांच्या संख्येत निम्म्या नगरसेविका असतानाही सॅनिटरी नॅपकिन्स वापराबाबत प्रबोधन, प्रशिक्षण तसेच विल्हेवाट यंत्रणा कार्यान्वित करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. शहरातील सर्व ४१ प्रभागांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स विल्हेवाट यंत्रणा कार्यान्वित करणे, महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे असे ठरावही कागदावरच राहिले आहेत. मात्र सॅनिटरी नॅपकिन्स गोळा करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचीही वस्तुस्थिती आहे.

शहरात प्रतीदिन २० टन सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा निर्माण होतो. सॅनिटरी नॅपकिन्स कचऱ्याची समस्या, त्यातून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न यामुळे सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट शास्त्रोक्त  पद्धतीने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून त्याबाबतचे धोरणात्मक निर्णयही वेळोवेळी घेण्यात आले. प्रत्यक्षात शहरात सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटी बाबत कमालीची अनास्था असल्याचे दिसून येत आहे.

घरोघरी जमा होणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सचा कचरा कचरासेवक उचलत नसल्यामुळे या प्रकारच्या कचऱ्याची समस्या मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली होती. त्यामुळे घरातून, शाळा, महाविद्यालयातून सॅनिटरी नॅपकिन्स उचलण्यासाठी लाखो रुपये खर्च करून महापालिकेने ठेकेदाराची नियुक्ती केली होती. तसेच शहराच्या काही भागात स्वतंत्र रंगसंगतीच्या कचरापेटय़ाही ठेवण्यात आल्या होत्या. मात्र घरोघरी जाऊन नॅपकिन्स गोळा केला जात नसल्याचे दिसून आले होते. त्याचे तीव्र पडसादही महापालिकेत उमटले होते. त्यानंतरही ही यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित करण्यात महापालिकेला यश आलेले नाही.

महापालिका शाळांतील विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स विनामूल्य उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीकडून तसा ठरावही करण्यात आला होता. सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यासाठी मध्यंतरी ठेकेदारही नियुक्त करण्यात आला. प्रारंभी काही शाळांमध्ये त्याचे वितरण झाले. त्यानंतर हे वितरण बंद पडले. सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक प्रभागात यंत्रणा विकसित करण्याचेही निश्चित करण्यात आले होते. मात्र सध्या जेमतेम बारा ठिकाणी ही योजना सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र या ठिकाणांचीही यंत्रणा सुरू असल्याबाबत साशंकताच आहे. प्रभागांमध्ये या प्रकारची यंत्रणा विकसित करण्यासाठी अंदाजपत्रकातही तरतूद करण्यात आली होती. मात्र ही तरतूद अन्य कामांसाठी वापरण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्ससंदर्भात महापालिकेमध्ये कमालीची अनास्था असून केवळ यंत्रणेच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे चित्र आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्स या प्रकारातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगवेगळ्या भागात बारा ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित आहे. याशिवाय स्वच्छ सर्वेक्षणातील बेस्ट टॉयलेटमध्येही ही सुविधा देण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांमध्येही विल्हेवाट यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.

ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख