देशातील सध्याच्या वातावरणाचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी केली. त्या शनिवारी पुण्यातील महात्मा फुले समता पुरस्कारानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते अरुंधती रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, यावेळी रॉय यांनी केलेल्या भाषणाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शविला.
सध्या लोकांना ज्याप्रकारे मारले जात आहे, जाळले जात आहे, या घटना पाहता देशातील परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. दलित आणि मागासवर्गीयांवरदेखील सध्या दडपशाही केली जात आहे. देश चालविणाऱ्या लोकांकडून भारत हिंदू राष्ट्र असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच विविध संस्था आणि अन्य माध्यमातून भारताच्या इतिहासाची नव्याने मांडणी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी रॉय यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी हिंदू धर्माचा त्याग केला तरीही त्यांच्या हिंदुकरणाचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आरक्षणाचे गाजर दाखवून दलितांना पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका अरुंधती रॉय यांनी केली.