23 November 2017

News Flash

तपासधागा : डॉक्टर महिलेला लुटणारे चोरटे तीन तासांत गजाआड

विशेषत: युवतींना त्रास देण्याचे प्रकार नेहमीच घडतात.

राहुल खळदकर | Updated: September 14, 2017 4:37 AM

कोथरूड भागातील म्हातोबा टेकडीवर नियमित फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या टेकडीवर गेल्या आठवडय़ात फिरायला गेलेल्या एका डॉक्टर महिलेला चाकूचा धाक दाखवून त्यांना चोरटय़ांनी लुटले. घाबरलेल्या महिलेने तातडीने पोलिसांकडे तक्रार दिली आणि पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. अवघ्या तीन तासांत पोलिसांनी डॉक्टर महिलेला लुटणाऱ्या चोरटय़ासह त्याच्यासोबत असलेल्या चार अल्पवयीन साथीदारांना पकडले.

शहरातील पर्वती, तळजाई, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडी या भागात दररोज सकाळी आणि सायंकाळी नियमित फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या टेकडय़ांना लागून असलेल्या वस्त्यांमधील उपद्रवी मुलांकडून फिरायला जाणाऱ्यांना त्रास दिला जातो. विशेषत: युवतींना त्रास देण्याचे प्रकार नेहमीच घडतात. उगीच वाद नको म्हणून काही जण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. काही वेळा फिरायला येणाऱ्यांना धमकावून लुटले जाते. आठ ते दहा वर्षांपूर्वी हनुमान टेकडी भागात सोमनाथ धोत्रे नावाच्या चोरटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. वेताळ टेकडी तसेच हनुमान टेकडी भागात अनेकांना लुटले होते. पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या लूटमारीच्या कृत्यांना आळा बसला. टेकडीलगतच्या वस्त्यांमध्ये राहणारी काही मुले शिक्षण सोडून देतात. कामधंदा करत नसल्यामुळे दिवसभर चकाटय़ा पिटण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. वस्तीतील चारदोन मुले हाताशी धरून दिवसभर टेकडीवर वेळ काढायचा, असा अनेक मुलांचा दिनक्रम होतो. कमी श्रमात झटपट पैसा मिळवण्यासाठी ही मुले टेकडीवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना धमकावून लूटमार सुरू करतात. बऱ्याचदा फिरायला येणारे नागरिक भीतिपोटी तक्रार देत नाहीत. पोलिसांकडे तक्रार न दिल्यामुळे या मुलांचे फावते आणि त्यांची धिटाईदेखील वाढते.

कोथरूड भागातील पौड रस्त्यालगत असलेल्या म्हातोबा टेकडीवर गेल्या सोमवारी (४ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे एक डॉक्टर महिला फिरायला गेली. महिलेचे पती डॉक्टर असून ते देखील गेली तेरा वर्षे टेकडीवर नियमित फिरायला येतात. त्या वेळी दोन मुले टेकडीवर थांबली होती. डॉक्टर महिला घाईत पुढे चालत निघाली. त्या वेळी दोन मुलांनी महिलेकडे किती वाजले, अशी विचारणा केली. महिलेने तिच्या हातातील मनगटी घडय़ाळ पाहून मुलांना वेळ सांगितली. तेवढय़ात एका मुलाने थेट महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्या गळय़ातील सोनसाखळी आणि मोबाइल संच असा ३४ हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. आरडाओरडा केला तर जीवे मारू, अशी धमकी मुलांनी महिलेला दिली. त्यानंतर महिलेला मागे न बघता सरळ पुढे चालत जाण्याची सूचना मुलांनी दिली. मुलांनी दिलेल्या धमकीमुळे घाबरलेली महिला मागे न बघता काही अंतर पुढे गेली.

काही वेळानंतर तिने मागे वळून पाहिले तर मुले पसार झाली होती. त्यानंतर घाबरलेली महिला गडबडीत टेकडी उतरून खाली आली आणि थेट कोथरूड पोलीस ठाणे गाठले. गणेश विसर्जनाचा आदला दिवस असल्याने पोलीस विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या तयारीत होते. घाबरलेल्या महिलेने कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांना या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पोलीस निरीक्षक फुगे यांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली आणि तातडीने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर खटके, उपनिरीक्षक दिगंबर जाखडे आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी लगेचच म्हातोबा टेकडीच्या परिसरात धाव घेतली. टेकडीचा परिसर पोलिसांकडून पिंजून काढण्यात आला. टेकडीवरून उतरणाऱ्या सर्व पायवाटांची पाहणी करण्यात आली. महिलेला लुटणारी मुले टेकडीलगतच्या सुतारदरा, म्हातोबानगर भागातील असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांची पथके या भागात पोहोचली आणि चौकशी सुरू केली. डॉक्टर महिलेने मुलांचे वर्णन पोलिसांना दिले होते. या वर्णनानुसार पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला. तेव्हा सुतारदरा भागातून एक अल्पवयीन मुलगा गडबडीत निघाला होता. तपास पथकातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्याच्याकडे मोबाइल संच सापडला. मोबाइल संचाबाबत विचारणा केली असता त्याने म्हातोबा टेकडीवर एका महिलेला धमकावून मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्यानंतर महिलेला लुटणाऱ्या त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. सुतारदरा भागातील चोरटा भगवान मरकळे (वय २३) महिलेला लुटण्यात सामील झाला होता. महिलेची हिसकावलेली सोनसाखळी त्याच्याकडे दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगा, त्याच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. मरकळेचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला.

मरकळे उत्तमनगर भागातील एका झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तातडीने उत्तमनगर भागातील त्या इमारतीत पोहोचले. सातव्या मजल्यावर महिलेच्या घरी लपलेल्या मरकळेने पोलिसांचे पथक इमारतीच्या पथकात पोहोचल्याचे पाहिले आणि तो पाचव्या मजल्यावर आला. तेथून तो इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या पाइपवरून उतरत होता. पाइपवरून उतरत असताना मरकळेचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

जखमी अवस्थेतील मरकळेला पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले. चौकशीत त्याने महिलेला लुटल्याची कबुली दिली. या प्रकरणी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, मरकळेला रुग्णालयातून सोडल्यानंतर त्याला या गुन्हय़ात अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर तातडीने तपास करून सराईत चोरटय़ांसह चार अल्पवयीन मुलांना पकडले. डॉक्टर महिलेने तीन तासांत गुन्हा उघडकीस आणून चोरटय़ांना पकडणाऱ्या पोलिसांचे मनोमन आभार मानले.

First Published on September 14, 2017 4:37 am

Web Title: investigation crime story thieves arrested kothrud police