गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने राज्यात साखळी पद्धतीने हजारो कोटी रुपये गोळा करणाऱ्या पर्ल अॅग्रोटेक कार्पोरेशन लि. (पल्स) या कंपनीने पुण्यातही मोठी रक्कम गोळा केल्याचे आढळून आले आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे मिळत नसल्याचे समोर आल्यानंतर पुण्यातील गुंतवणूकदारांनी ‘पल्स’च्या डेक्कन परिसरातील कार्यालयाला भेट दिली. मात्र, हे कार्यालय बंद असल्यामुळे पैसे मिळवण्यासाठी पन्नास गुंतवणूकदारांनी डेक्कन पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाची ‘सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’कडून (सेबी) चौकशी सुरू आहे.
कर चुकवेगिरी, मनी लाँड्रींग यासह इतर गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सीबीआयच्या चौकशी समितीने पर्ल अॅग्रोटेक कार्पोरेशन लि. या कंपनीच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. सेबी ऑगस्ट २०१४ मध्ये कंपन्याच्या चौकशीचा अहवाल सादर केला असून त्यामध्ये पल्स कंपनीच्या गैरव्यवहारावर ठपका ठेवला आहे. त्यांनी ऑगस्ट महिन्यात पल्स कंपनीला यापुढे साखळी पद्धतीने पैसे जमा करण्यास प्रतिबंध केला होता. तसेच, तीन महिन्यांच्या आत गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने तीन महिन्यांत पैसे परत न केल्यास त्या त्या राज्याच्या मदतीने कंपनीच्या संचालकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सेबीने दिला आहे. मात्र, अद्यापपर्यंत अनेक गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून पल्स कंपनीची राज्यातील कार्यालये बंद झाल्यामुळे लाखो गुंतवणूकदार हजारो कोटी गुंतविल्यामुळे अडचणीत आले आहेत. त्याबरोबर कंपनीने ही सर्व रक्कम एजंटमार्फत गोळा केल्यामुळे एजंटनासुद्धा आता ही रक्कम कोठून द्यायची हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्य़ात एजंटनी आत्महत्या केल्याचे प्रकार घडले. या कंपनीमध्ये पुण्यातील नागरिकांनीही गुंतवणूक केली असून पैसे मिळावे म्हणून कार्यालयात धाव घेतली. पण, कंपनीचे कार्यालय बंद असल्यामुळे शेवटी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हा तक्रारीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पल्स कंपनीत गुंतवणूक केलेले पैसे मिळत नसल्याची चर्चा सुरू आहे. या कंपनीत पुण्यातील नागरिकांनीही एजंटमार्फत पैसे गुंतविले असून त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पल्स कंपनीच्या पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र, सध्या हे कार्यालय बंद आहे. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी नोटीस लावली असून गुंतवणूकदारांना काही तक्रार असेल, तर डेक्कन पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गेल्या पाच दिवसांमध्ये तीस अर्ज आले असून त्यामध्ये पन्नास जणांनी ‘गुंतवणूक केलेले पैसे परत द्यावेत,’ अशी मागणी केली आहे.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी सांगितले, की पल्स कंपनीत गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी पैसे परत मिळावेत म्हणून तक्रारी केल्या आहेत. याबाबत सेबीने कंपनीला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘‘मी गेल्या पाच वर्षांपासून नियमित पल्समध्ये पैसे भरत आहे. आता फक्त शेवटचा हफ्ता भरायचा राहिला होता. पण, पल्समध्ये भरलेले पैसे मिळाले नसल्याच्या बातम्या पाहिल्या. डेक्कन येथील कार्यालयात चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर ते बंद असल्याचे आढळून आले. माझ्या प्रमाणेच हिंजवडी येथील एका मित्रानेही पैसे गुंतविले आहेत. एक ते दोन दिवसांत डेक्कन पोलिसांकडे तक्रार देणार आहोत.’’
किरण जाधव, ‘पल्स’चे गुंतवणूकदार (खडकी)