उद्योग क्षेत्रात नजीकच्या कालखंडात पुणे जिल्ह्य़ामध्ये सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील कंपन्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असून २० कंपन्यांबरोबर सामंजस्य करारही (एमओयू) झाले आहेत. यामध्ये एका चिनी कंपनीचा समावेश आहे. तर, राज्यामध्ये पाच लाख कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आणण्याचे उद्द्ष्टि ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे २० लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार असून शेतीवरील बोजा कमी होईल.
कृषी महाविद्यालय मैदानावर भरविण्यात आलेल्या ‘महाटेक २०१५’ या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले; त्या प्रसंगी सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्ता धनकवडे, मराठे इन्फोटेकचे संस्थापक काकासाहेब मराठे, संचालक विनय मराठे, दिनेश राठी आणि सदाशिव बर्गे या वेळी उपस्थित होते.
उद्योगातील गुंतवणुकीसाठी पुणे आघाडीवर आहे. मात्र, पुण्यामध्ये जागेची कमतरता आहे. ‘एमआयडीसी’मध्ये वर्षांनुवर्षे वापर न करण्यात आलेले औद्योगिक भूखंड ताब्यात घेऊन लवकरात लवकर उद्योग उभारू शकणाऱ्या उद्योगांना जागा देत ही अडचण दूर करण्यात येणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्य़ातील काही उद्योग कर्नाटकामध्ये स्थलांतरित होणार होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. ३०० उद्योगांना नोटिसा दिल्या. त्यापैकी ९ भूखंड ताब्यात आले असून आणखी ९१ भूखंड महिन्याभरात ताब्यामध्ये येतील. हा प्रयोग पुण्यासह राज्यभरात राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतीला दिल्या जाणारा ८ हजार कोटी विजेच्या सबसिडीचा बोजा उद्योगावर टाकला जातो. उद्योगांना महागडी वीज घ्यावी लागते हे वास्तव आहे. काही प्रकल्पांच्या पूर्तीमुळे राज्याला मोठय़ा प्रमाणावर वीज उपलब्ध झाल्यानंतर ती स्वस्त होईल, असे सांगून सुभाष देसाई म्हणाले,‘‘ उद्योगामध्ये महाराष्ट्र आघाडीवरच आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उद्योग क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे महाराष्ट्राची पिछाडी झाली. ही पिछाडी भरून काढत पहिला क्रमांक टिकवून ठेवत आणखी पुढे जायचे आहे.’’
रस्ते, वीज, वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था या उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गिरीश बापट यांनी दिले. घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान विकसित करून उद्योजकांनी पुणेकरांची मुक्तता करावी, असे आवाहन दत्ता धनकवडे यांनी केले. विनय मराठे यांनी प्रास्ताविक केले.