स्थानिक संस्था करासाठी (लोकल बॉडी टॅक्स-एलबीटी) नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांनी दरमहा वेळेत कर भरण्याची काळजी घ्यावी अन्यथा कायद्यातील तरतुदीप्रमाणे कडक कारवाई करावी लागेल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याचा एलबीटी भरण्यासाठी शुक्रवारचा पूर्ण व शनिवारचा अर्धा असे दीडच दिवस शिल्लक असल्याचे लक्षात आणून देण्यात आले आहे.
सहमहापालिका आयुक्त विलास कानडे यांनी एलबीटीसंबंधीची माहिती गुरुवारी दिली. प्रत्येक महिन्याच्या दिनांक २० पर्यंत गेल्या महिन्यातील एलबीटी भरण्यासाठी मुदत दिली जाते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा एलबीटी भरण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर असून त्या दिवशी रविवार असल्यामुळे बँकांना सुटी आहे. तसेच १९ ऑक्टोबर (शनिवार) रोजी बँकाचे कामकाज अर्धा दिवस चालणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा एलबीटी भरण्यासाठी शुक्रवारचा (१८ ऑक्टोबर) पूर्ण दिवस व शनिवारचा (१९ ऑक्टोबर) अर्धा असे दीड दिवसच शिल्लक असल्याचे लक्षात आणून देण्यात आले आहे. एलबीटीचा भरणा शनिवापर्यंत न झाल्यास सवलत दिली जाणार नाही, असेही कानडे यांनी स्पष्ट केले आहे.
एलबीटीचा आकारणी सुरू झाल्यानंतर जे व्यापारी कराचा भरणा करत नाहीत असे निदर्शनास आले आहे, अशांपैकी ५१४ व्यापाऱ्यांना/व्यावसायिकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यापैकी ६३ व्यापाऱ्यांनी/व्यावसायिकांनी पाच महिन्यांचा मिळून एक कोटी १६ लाख रुपये जमा केल्याचे सांगण्यात आले.
बावीस कोटींची जमा
महापालिकेकडे सप्टेंबर महिन्याचा २२ कोटी ७२ लाख रुपये इतका एलबीटी गोळा झाला असून सहा हजार ७६० व्यापाऱ्यांनी/व्यावसायिकांनी ही रक्कम जमा केली आहे.