ठेकेदारांकडून प्रवाशांच्या लुटीनंतर निर्णय; खाद्यपदार्थाची पावती देणे बंधनकारक

रेल्वे गाडय़ांमधील पेन्ट्री कार, डायनिंग कारच्या माध्यमातून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावर तब्बल १८ टक्के वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) आकारणी करून ठेकेदारांकडून प्रवाशांची लूट सुरू होती. मात्र, आता याबाबत रेल्वे बोर्डाच्या निर्णयानुसार संबंधित ठेकेदारांसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) स्पष्ट आदेश काढले असून, रेल्वेत मिळणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थावर केवळ पाच टक्केच जीएसटी आकारणीचे बंधन घातले आहे. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थाची पावती देणेही सक्तीचे करण्यात आले आहे.

रेल्वे गाडय़ांमध्ये प्रवाशांकडून १८ टक्के जीएसटीनुसार खाद्यपदार्थाचे पैसे उकळून लूट केली जात असून, खाद्यपदार्थाच्या पावत्या देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. याबाबत प्रवाशांच्या तक्रारींनुसार ‘लोकसत्ता’ने १३ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.  जीएसटी सुरू झाल्यानंतर रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थाचे स्टॉल, फूडमॉल आदी ठिकाणच्या खाद्यपदार्थावर शहरातील हॉटेलप्रमाणेच पाच टक्के जीएसटीची आकारणी सुरू करण्यात आली. मात्र, धावत्या रेल्वेमधील स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या आणि पेन्ट्री कार, डायनिंग कारमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाना वेगळ्या विभागात टाकून त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला होता. मोबाइल प्रकारातील या स्वयंपाकघरातील खाद्यपदार्थावर १८ टक्के जीएसटी असल्याचे रेल्वे बोर्डाकडूनही सांगण्यात येत होते. मात्र,अर्थ मंत्रालयाकडून ५ टक्के जीएसटी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनंतरही  काही ठेकेदार १८ टक्के जीएसटी आकारून पूर्वीच्याच दरामध्ये खाद्यपदार्थाची विक्री करीत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. खाद्यपदार्थाच्या पावत्या न देता प्रवाशांबरोबरच शासनाचीही लूट होत असल्याबाबतच्या विषयाला रेल्वे प्रवासी  ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनीही वाचा फोडली. प्रवाशांची लूट होत असताना रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीची भूमिकाही ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशीच असल्याची टीका करण्यात येत होती. त्यानंतर आयआरसीटीसीने याबाबत स्पष्ट आदेश काढले आहेत. या आदेशानुसार रेल्वे गाडय़ांतील खाद्यपदार्थावर ५ टक्क्यांहून अधिक जीएसटी आकारता येणार नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक आणि गाडय़ांतील खाद्यपदार्थाच्या दरात समानता आली आहे.

पेन्ट्री कारमध्ये दरपत्रक लावणे सक्तीचे

इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) काढलेल्या आदेशानुसार कोणत्याही खाद्यपदार्थाबाबत प्रवाशाला पावती देणे सक्तीचे करण्यात आले आहे. जीएसटीच्या आकारणीसह ही पावती असेल. त्याचप्रमाणे गाडय़ांमध्ये पेन्ट्री कार, डायनिंग कारमध्ये खाद्यपदार्थाचे दरपत्रक लावणे आणि पाच टक्के जीएसटी आकारणीनुसार मेन्यू कार्ड तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आयआरसीटीसीकडून सर्व पदार्थाचे खाद्यपदार्थ आणि पेयांचे प्रमाणित दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.