19 January 2019

News Flash

प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा रशियातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक दूत

प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा या मॉस्को येथील ओरिएन्टल रीसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये मराठी भाषेच्या संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.

 रशिया भेटीवर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा यांना महाराष्ट्राच्या रशियातील सांस्कृतिक दूत म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र देताना.

मराठी माती आणि संस्कृतीशी साडेचार दशकांपासून नाळ जोडल्या गेलेल्या विदुषी प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा यांची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा या मॉस्को येथील ओरिएन्टल रीसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये मराठी भाषेच्या संशोधिका म्हणून कार्यरत आहेत. प्राच्यविद्या संशोधनासाठी १९७० पासून त्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये नियमितपणे येत आहेत. श्री विठ्ठल या महाराष्ट्राच्या दैवतावर काम करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेविषयी आस्था असलेल्या प्रा. ग्लुश्कोव्हा यांनी आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या पंढरपूर येथील वारीचा सखोल अभ्यास केला आहे. मॉस्को येथील ओएिन्टल रीसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांवर त्यांचा अभ्यास सुरू आहे. मराठय़ांचा इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. हा अभ्यास करण्याकरिता त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी लिपी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा यांची महाराष्ट्राच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या दूत (बॅँड्र अ‍ॅम्बेसिडर) म्हणून नियुक्ती केली.

धर्माला अफूची गोळी मानणाऱ्या साम्यवादी देशातील एका विदुषीने श्री विठ्ठल या  महाराष्ट्राच्या लोकप्रिय दैवतावर काम करण्याचे ठरविले आणि वारकरी दिंडय़ांतून हिंडून त्यांनी भक्ती परंपरेची माहिती घेतली. ‘या देवाला तुम्ही घरचा कुटुंबातील मानता, पोषाख परिधान करून खाऊ घालता याचं मला आश्चर्य वाटतं’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती, अशी माहिती या प्रकल्पामध्ये त्यांच्यासमवेत असलेले भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांनी दिली.

प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा या काही काळ मॉस्को विद्यापीठामध्ये हिंदूीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर त्या प्राच्यविद्या क्षेत्राकडे वळाल्या आणि मॉस्को येथील ओरिएन्टल रीसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये ज्ञानोबा-तुकोबा यांच्या रचनांवर काम करीत आहेत. या अभ्यासासाठी त्यांनी आळंदी आणि देहू येथे वारंवार भेट दिली आहे.

 

First Published on July 14, 2016 4:45 am

Web Title: irina glushkova to be ambassador of state culture and tourism