दहा महिन्यांत  ६०६ तक्रारी; वैमनस्य, एकतर्फी प्रेमातून वाढते गैरप्रकार

समाजमाध्यमांचा वापर वाढला असून अगदी शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजमाध्यमांचा सर्रास वापर केला जात आहे. हे प्रमाण वाढते असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे समाजमाध्यमात प्रसारित केल्या जाणाऱ्या अश्लील, बदमानीकारक मजकुराबाबतच्या तक्रारींचे प्रमाणही वाढत आहे. यंदा गेल्या दहा महिन्यांत सायबर गुन्हे शाखेकडे अशा प्रकारच्या ६०६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. वैमनस्य आणि एकतर्फी प्रेमातून अशा प्रकारचा मजकूर प्रसारित केला जात असल्याचे निरीक्षण सायबर गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आले आहे.

व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमांचा वापर वाढत चालला आहे. समाजमाध्यमात एखाद्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे किंवा अश्लील मजकूर प्रसारित करणे हा गुन्हा असल्याची जाणीव अनेकांना नाही. महाविद्यालयीन युवक तसेच शाळकरी मुलांकडून समाजमाध्यमांचा वापर वाढत असून असूया, भांडण, गैरसमज तसेच एकतर्फी प्रेमातून बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्याचे प्रमाण वाढत आहे. समाजात तेढ  निर्माण करणारे संदेश पाठविले जातात. मात्र, समाजमाध्यमात सर्वाधिक लक्ष्य युवती तसेच महिलांना केले जाते. त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाक ण्याचे प्रमाण वाढते असल्याचे निरीक्षण सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी नोंदविले.

बऱ्याचदा समाजमाध्यमांवर असलेल्या छायाचित्रांमध्ये फेरफार करून गैरप्रकार केले जातात. त्यामुळे शक्यतो समाजमाध्यमांवर स्वत:ची माहिती, छायाचित्रे, कुटुंबाची माहिती प्रसारित करू नका. अनोळखी व्यक्तीने मैत्रीची विनंती पाठविल्यास प्रतिसाद देऊ नका. समाजमाध्यमावर एखाद्या व्यक्तीविषयी जाहीर भाष्य करताना अयोग्य भाषेचा वापर करू नका, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी केले आहे.

गैरकृत्ये!

* फेसबुक, इन्स्टाग्रामवर युवतींची अश्लील छायाचित्र

* राजकारण्यांची बदनामी

* बनावट खाते उघडून बदनामी

* फेसबुक खाते हॅक करून खंडणी