पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवाला धरणातून दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतल्यानंतर या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जलसंपदा विभागाच्या सिंचन भवन या कार्यालयात मोठी तोडफोड करून पाण्याच्या वादात ‘स्टंट’ केला.
दौंडला पाणी देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मनसेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील सिंचन भवनच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी दिसेल त्या साहित्याची मोडतोड सुरू केली. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता कपोले यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्याही कार्यालयाचेही मोठे नुकसान या कार्यकर्त्यांनी केले. या प्रकारात कार्यालयातील काचा तसेच टाईल्सही फोडण्यात आल्या. तसेच टेबल, खुच्र्याचीही मोडतोड करण्यात आली. मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह आणखी दहा कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तोडफोडीत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार सिंचन भवनमधील कर्मचारी संतोष आंबडकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात दिली आहे.
दौंड आणि इंदापूरने केलेल्या मागणीनुसार या तालुक्यांना खडकवासला धरणातून पाणी देण्याबाबतचा वाद आठवडाभर पुण्यात सुरू होता. पुण्यात गेले आठ महिने सुरू असलेल्या पाणीकपातीमुळे वाचलेले पाणी दौंड व इंदापूरला देऊ नये तसेच पिण्यासाठी पाणी द्यायचे झाल्यास दौंडला अर्धा टीएमसीच्या वर पाणी देऊ नये, अशी भूमिका पुणे महापालिकेने घेतली होती. हा वाद सुरू असतानाच सोमवारी पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड, इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
दौंड, इंदापूरला पाणी देण्याच्या विरोधात विविध राजकीय पक्ष-संघटनांनी निषेध व्यक्त केला असून बापट यांच्यावर टीकाही केली आहे. मात्र कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचा निषेध सिंचन भवन फोडून करण्याचा प्रकार मनसेने केल्यानंतर पाण्याच्या वादाला आता भारतीय जनता पक्ष विरुद्ध मनसे असे स्वरूप आले आहे. सिंचन भवनात मोडतोड करून मनसेने काय साधले असाही प्रश्न विचारला जात आहे.

ग्रामीण भागांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र ते पाणी देण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. अन्यथा पुणेकरांचे पाणी पळवणाऱ्यांना मनसे जाब विचारेल.
अजय शिंदे, शहराध्यक्ष, मनसे

पुणे शहराचे राजकीय वातावरण सहिष्णू ठेवायचे का नाही याचे भान सर्व राजकीय पक्षांनी ठेवावे, एवढेच आमचे म्हणणे आहे. त्या बरोबरच विषय काय आहे आणि काही पक्ष त्या बाबत काय करत आहेत हे समजण्याइतपत पुणेकर सुज्ञ आहेत, हेही सर्वानी लक्षात ठेवावे.
योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप