राज्यात विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना अनेक राजकीय पक्षाकडून उमेदवारांसाठी मुलाखती आणि दौरे केले जात आहे. याच दरम्यान पुण्यात आज भाजपा कार्यालयात राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग शेलार यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघासाठी मुलाखत दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याकडून मतदारसंघाचे दौरे केले जात आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप आघाडीवर असून पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील आठ मतदारसंघासाठी मुलाखती पार पडल्या. या आठ मतदारसंघातून तब्बल 107 जण इच्छुक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे आगामी काळात भाजप पक्ष श्रेष्ठींना शहरातील आठ आमदारांना पुन्हा संधी द्यायची की महायुती असल्याने शिवसेनेला काही जागा सोडायच्या यावर तोडगा काढताना खऱ्या अर्थाने त्यांना कसरत करावी लागणार आहे. त्याच दरम्यान पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांच्या मतदारसंघातून एकूण 15 जणांनी मुलाखती दिल्या. यामध्ये पुणे जिल्हा पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग शेलार यांनी देखील मुलाखत दिली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या मुलाखती बाबत पांडुरंग शेलार यांच्याशी संवाद साधला असता. ते म्हणाले की, “मी अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहे. त्या माध्यामांतून समाजात काम करत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य पाहून राजकारणात जाण्याचा निर्णय मागील काही महिन्यापासून माझ्या मनात आला. माझ्या निवृत्तीला साधारण चार महिन्याचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे मी जून महिन्यात स्वईच्छा निवृत्तीचा अर्ज शासनाकडे केला आहे. स्वईच्छा निवृत्ती निर्णयाचे काम अंतिम टप्प्यात असून त्यावर लवकरच निर्णय होईल.” त्याच बरोबर या निवडणुकीत पुणे कॅन्टोन्मेंटमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.