शिरूर मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा कित्येक वर्षे सुरू आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे आधीचे प्रदेशाध्यक्ष तसेच खासदार सुप्रिया सुळे या सर्वाशी कितीतरी भेटी व चर्चा झाल्यानंतरही खासदार कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा वैतागले असून, आढळराव लोकसभा निवडणुकीपर्यंत गाफिल ठेवून आपला ‘कात्रजचा घाट’ तर करणार नाहीत ना अशी शंका बोलून दाखवत आहेत.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी आढळराव यांचे चांगले संबंध नाहीत. ते पक्षात अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांची बऱ्याच काळापासून बोलणी सुरू आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आधीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केल्या आहेत. ते शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आज येणार की उद्या, एवढेच काय ते बाकी आहे इथपर्यंत चर्चा होती. आढळराव यांच्या राष्ट्रवादीतील आगमनाच्या चर्चेने पक्षाचे नेते व विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील नाराज आहेत. त्यांची नाराजी पत्करूनसुद्धा राष्ट्रवादी आढळराव यांना पक्षात घ्यायला तयार आहे. याची काही कारणे आहेत. आढळराव हे दोनदा खासदार राहिले आहेत. मागच्या निवडणुकीत तर त्यांच्याविरुद्ध उभे करण्यासाठी ताकदीचा उमेदवारही राष्ट्रवादीकडे नव्हता. याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार राष्ट्रवादीचेच आहेत. तरीसुद्धा खासदार नसल्याची खंत आहे. या वेळी लोकसभेतील जागा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आढळराव यांना पक्षात घेतले तर ही हक्काची जागा ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असतानाच आढळराव मात्र चर्चेच्या पलीकडे काही निर्णय घेत नाहीत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले, ‘आढळराव यांचा आम्हाला गाफिल ठेवण्याचाच डाव दिसतो आहे. पक्षात यायचेच असेल तर आता कुंपणावर बसून न राहता लवकर निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. लोकसभा निवडणुका सहा-सात महिन्यांवर आलेल्या असताना आता नाही तर कधी निर्णय घेणार?’ काही नेते अशी भूमिका घेत असले तरी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना आढळराव यांच्या पक्षप्रवेशाबाबत अजूनही आशा आहेत. मात्र, आता विविध जनमत चाचण्यांनी केंद्रातील लोकशाही आघाडी सरकारची सत्ता येणार नसल्याचे दर्शवले आहे. त्यामुळे आढळराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशास मुहूर्त लागणार का, याबाबत उत्सुकता आहे.
आढळरावांविरुद्ध लढणार कोण?
खासदार आढळराव यांनी राष्ट्रवादीत येण्यास नकार दिला तर त्यांच्याविरुद्ध कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत राष्ट्रवादीमध्ये चिंता आहे. दिलीप वळसे-पाटील उभे राहिले तर चांगली लढत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, ते लोकसभेला लढण्यास तयार नाहीत. ते लढले नाहीत तर इतर कोणाला उमेदवारी द्यायची, ही समस्या राष्ट्रवादीमध्ये कायम आहे.