‘गेरा रेसिडेन्शिअल रिअल्टी’ अहवालातील निरीक्षण

बांधकाम क्षेत्र कठीण परिस्थितीतून जात असताना घरांच्या किमतीमध्ये घट दिसून येत आहे. शहरातील निवासी घरांच्या किमती सलग चार सहामाही म्हणजे दोन वर्षे घसरत असल्याचे निरीक्षण गेरा रेसिडेन्शिअल रिअल्टी अहवालात नोंदविण्यात आले आहे. डिसेंबर २०१५ मध्ये असलेला ५ हजार ९६ प्रती चौरस फुटांचा दर आजमितीस सरासरी ४ हजार ७४० रुपये प्रती चौरस फुट असा झाला असून गेल्या सहा महिन्यांमध्ये दरातील तफावत ही ०.९७ टक्के अशी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या गेरा डेव्हलपमेंट्स या कंपनीने डिसेंबर २०१७ चा रेसिडेन्शिअल रिअल्टी अहवाल सादर केला. या अहवालातील निरीक्षणांबाबतची माहिती गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. न विकलेल्या जागांची संख्या कमी झाली, तरीही बाजारपेठेत नवीन प्रकल्पांमध्ये कमतरता आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात बोलताना रोहित गेरा म्हणाले, बांधकाम क्षेत्रासाठी सन २०१७ हे वर्ष अनोखे वर्ष ठरले. वर्षांची सुरुवात ही नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीतून झाली. या निर्णयामुळे घरांच्या किमती तीस ते चाळीस टक्क्य़ांनी कमी होतील, असा समज निर्माण झाला. यामुळे नवीन विक्री थांबली. त्यातच रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅक्ट (रेरा) सुरू झाल्यामुळे ग्राहकांना प्राथमिकतेतून घरे देणे विकसकांनी सुरू केले. त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी भांडवलही उभे करणे कठीण झाले आहे. रेराची पूर्ण अंमलबजावणी झाल्यामुळे विकासकांना प्रकल्पाच्या सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय विक्री सुरू करता येत नाही. त्याचबरोबरच विक्रीतील ७० टक्के हिस्सा हा विशिष्ट खात्यात ठेवावा लागतो.

सन २०१७ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये ३७ टक्क्य़ांनी घट झाली आहे. सदनिकांच्या विक्रीतही घट झाली असून सन २०१७ मध्ये ७६ हजार १४९ घरांची विक्री झाली. त्यापूर्वी म्हणजे सन २०१६ मध्ये ९३ हजार ९९५ घरांची विक्री झाल्यामुळे ही घट १९ टक्क्य़ांची राहिली. शहरातील न विकल्या गेलेल्या जागांची संख्या ही ३४.२९ टक्क्य़ांवरून कमी होत २८.४३ टक्क्य़ांवर आली आहे.