एटीएस प्रमुख विवेक फणसाळकर यांची कबुली; प्रभाव टाळण्यासाठी लवकरच संकेतस्थळ
महाराष्ट्रासह देशातील दहा ते बारा राज्यांमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढत असून राज्यातील काही तरुण या संघटनेकडे आकर्षित झाल्याची कबुली महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख (एटीएस) विवेक फणसाळकर यांनी दिली आहे. आयसिसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लवकरच एटीएसचे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती फणसाळकर यांनी रविवारी येथे दिली.
प्रजासत्ताकदिनाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभर केलेल्या कारवाईत आतापर्यंत १३ आयसिस समर्थकांना अटक केली आहे. त्यात राज्यातील चौघांचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर आयसिसची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एटीएसने आता व्यापक प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एटीएसचे संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. फणसाळकर यांनी रविवारी येथील एटीएस कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यात आयसिसचा प्रभाव वाढत असल्याची कबुली दिली. ते म्हणाले, आयसिसच्या प्रभावाखाली देशभरातील दहा ते बारा राज्ये आहेत. त्यापैकी महाराष्ट्र एक आहे. इंटरनेट, फेसबुक या माध्यमातून काही तरुण मूलतत्त्ववाद्यांच्या प्रभावाखाली येत आहेत. त्यांना त्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी एटीएसवर आहे. तसेच काहीजण आयसिसमध्ये सामील होण्यासाठी बेपत्ता होत आहेत. त्यांच्याही मागावर आम्ही आहोत. आयसिसच्या प्रभावाखाली येणाऱ्या तरुणांचे प्रबोधन आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी एटीएस सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुस्लिम समाजातील मौलवींशी आम्ही संपर्कात आहोत. त्या अनुषंगाने राज्यभरात बैठका घेतल्या जात आहेत. बहुतांश मुस्लिमांचा आयसिसला विरोधच आहे. मात्र, आयसिसच्या प्रभावाखाली येऊन जे तरुण वाट चुकलेले आहेत त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आयसिसच्या प्रभावापासून परावृत्त करण्यासाठी एटीएस सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुस्लिम समाजानेही या कामासाठी पाठिंबा दर्शवल्याचे फणसाळकर यांनी अखेरीस स्पष्ट केले.
९४ संकेतस्थळे बंद
आयसिसशी संबंधित असलेली ९४ संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. या संकेतस्थळावर तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभने दाखविण्यात येत होती. देशभरातील तपास यंत्रणांनी अशा संशयित संकेतस्थळांची यादी तयार करून ती केंद्र शासनाकडे पाठवली होती व ती बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत.
दरम्यान, भारतात घातपाती कारवाया करणाऱ्या ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेनेच ‘आयसिस’चा (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) प्रसार सुरु केल्याचे आढळून येत आहे. राज्यातून पकडलेले गेलेले आयसिसचे
कथित तीन दहशतवादी हे ‘इंडियन मुजाहिद्दीन’शी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.