‘देशातील मोठय़ा व्यावसायिकांनी माध्यमांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यातून जनमत आणि सरकारी धोरणे बदलण्याबरोबरच माध्यमे आता पैशाच्या मागे पळू लागली आहेत. राजकारण आणि अर्थकारणाचाच फक्त विचार करण्यामुळे माध्यमांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार परोंजय गुहा ठाकुरता यांनी शनिवारी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ठाकुरता बोलत होते. ‘भारतातील माध्यम-मालकीच्या बदलत्या प्रवाहांचे परिणाम’ या विषयावर ठाकुरता यांनी आपले विचार मांडले. या वेळी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मीडियाराइज’ या वार्षिक अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. या वेळी विभागप्रमुख माधवी रेड्डी, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
या वेळी ठाकुरता म्हणाले, ‘माध्यम समूह हे व्यावसायिक झाले आहेत. मोठय़ा उद्योगांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून थेट फायदा होत नसला, तरी त्यातून जनमत तयार केले जाते. आता त्याच्या जोडीला माध्यमे पैशाच्या मागेही लागली आहेत. त्यामुळे माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांची सत्याता पडताळणे गरजेचे ठरले आहे. एकिकडे व्यावसायिक स्वरूप आणि माहितीच्या क्षेत्रात सोशल नेटवर्किंग साइट्सनी वाढवलेली स्पर्धा यांच्या कचाटय़ात माध्यमे सापडली आहेत.’ या वेळी पेड न्यूजबाबत ते म्हणाले, ‘पेड न्यूजमुळे एखाद्या माध्यम समूहाची किंवा व्यक्तीची विश्वासार्हता धोक्यात येत नाही, तर संपूर्ण माध्यमांचा लाचारपणा समोर येतो. चांगले पत्रकार व्हायचे, की एखाद्या संस्था किंवा व्यक्तीचा जनसंपर्क अधिकारी हे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्यापूर्वीच ठरवायला हवे.’