01 October 2020

News Flash

शहरबात : संगनमताची नालेसफाई

ढील पंधरा दिवसांत नालेसफाईची कामे पूर्ण होतील, अशी सुतराम शक्यता नाही.

अविनाश कवठेकर

पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी नालेसफाईच्या मुद्दय़ावरून महापालिकेत रणधुमाळी सुरू होते. यंदाही रखडलेल्या नालेसफाईच्या कामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या, भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराच्या आरोपांनंतरही नाल्यांमधील गाळ साफ होतो की नाही, हे सांगता येत नाही, हाच आजवरचा सर्वाचा अनुभव आहे. पण नालेसफाईचे कारण देत महापालिकेची तिजोरी लुटण्याचा प्रकार नेहमी होतो आणि त्यातून नालेसफाईसंबंधीचे काही प्रश्न अनुत्तरित रहातात, ही वस्तुस्थिती आहे.

महापालिकेच्या स्तरावर दरवर्षी ठरावीक कालावधीत काही विषय पुढे येतात. नालेसफाई हा त्यापैकी एक विषय. पावसाळ्याच्या तोंडावर अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना नाल्यांची आठवण होते. एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईच्या कामांना प्रारंभ होतो. मे महिन्याअखेर पर्यंत नालेसफाईची कामे होणे अपेक्षित असताना यंदा ती अद्यापही सुरू झालेली नाहीत. पुढील पंधरा दिवसांत नालेसफाईची कामे पूर्ण होतील, अशी सुतराम शक्यता नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे निमित्त नालेसफाईची कामे रखडण्यास कारणीभूत ठरले. अल्पमुदतीच्या निविदा काढून ही कामे युद्धपातळीवर केली जातील, असा दावा महापालिकेच्या अधिकारी वर्गाकडून केला जातो आहे. मात्र जून महिन्यातील पहिल्या पावसात हा दावाही वाहून जाण्याची शक्यता अधिक आहे. रखडलेल्या कामांमुळे सत्ताधारी-विरोधक आणि अधिकारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होतील, असेच चित्र या वेळीही आहे. पण लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदार या कोणालाही कामात पारदर्शकता नको असते, हेच वास्तव आहे. पावसाळा जवळ आला की निविदा प्रक्रिया राबवायची आणि राजकारण्यांच्या मदतीने ठेकेदारांच्या खिशात कंत्राटे देण्याचा परिपाठ महापालिकेत वर्षांनुवर्षे सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी नालेसफाई करूनही नाल्यातील गाळ संपत नाही, यातूनच सर्व काही स्पष्ट होते.

नालेसफाई, ओढे-नाल्यांमधील राडारोडा उचलणे, नदीतील घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उचलणे आदी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचा आढावा दरवर्षी प्रशासकीय पातळीवर घेण्यात येतो. क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही कामे केली जातात. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये कोटय़वधी रुपयांची तरतूद केली जाते. वास्तविक, या प्रकारच्या अत्यावश्यक कामांना कोणत्याही आदेशाची वाट न पहाता प्रारंभ होणे अपेक्षित असते. यंदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही क्षेत्रीय कार्यालयांकडून निविदा प्रक्रिया काढण्यात आली नाही. त्यातच निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. मात्र त्यानंतर नालेसफाईची कामे करण्यास मान्यता दिली जाईल, हे निश्चित आहे. मात्र ती पूर्ण होणार का, हा मुख्य प्रश्न असून गैरव्यवहार होणार नाही, याची खात्री कोणीही देऊ शकणार नाही.

नालेसफाईच्या कामांसाठी वेळेत प्रक्रिया पूर्ण करुनही काहीशा विलंबाने दिखाऊ कामेच होतात हे अलीकडे सातत्याने पुढे आले आहे. कामे अपूर्ण असतानाही ती योग्य प्रकारे झालेली नसतानाही पुणेकरांच्या कररूपातून जमा झालेले कोटय़वधी रुपये ठेकेदारांच्या खिशात घातले जातात. जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यांमुळे किती घातक परिस्थिती निर्माण होते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना होणे अपेक्षित आहे. मात्र कागदोपत्री पोकळ आकडेवारीतून कामे केल्याचे भासविण्यात येते. भविष्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण, याबाबत कोणीही बोलत नाही.

नालेसफाईचा विषय आला की शहरात किती लांबीचे नाले, पावसाळी गटारे, वाहिन्या आहेत याची माहिती कागदावर मांडली जाते. नालेसफाईच्या कामांना गती देण्यासाठी ठरावीक दिवसांनी त्याचा आढावा घेण्याचेही निश्चित होते. त्याहूनही काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. पण एवढे करूनही अंमलबजावणी किती होते, नाल्यातून किती गाळ काढण्यात आला, त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली, याची उत्तरे मात्र कधीच पुढे येत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य होत असल्याचे जून महिन्यातील पहिल्या एक-दोन पावसातच स्पष्ट होते. अपूर्ण कामांमुळे नागरिकांना त्रास होतो, अशा तक्रारी सुरू झाल्या की ठेकेदाराला पैसे दिले जाणार नाहीत, असा दावा होतो. पण चर्चा थांबली की पैसे ठेकेदाराला दिले जातात. ही कार्यपद्धती ठेकेदारांनाही माहिती आहे. त्यामुळे आरोप होऊनही पुढील वर्षी त्याच ठेकेदारांना काम मिळते किंबहुना हेच ठेकेदार नालेसफाईची कंत्राटे अधिकारी आणि राजकारण्यांच्या मदतीने मिळवितात, हे वास्तव आहे.

शहरातील नाल्यांलगत मोठय़ा प्रमाणात बांधकामे झाली आहेत. बांधकामांसाठी नाले बुजविण्याचे प्रकारही करण्यात आले आहेत. शहरातील स्वयंसेवी संस्थांनी त्याबाबत सातत्याने आक्षेप नोंदविले आहेत. एवढेच काय,पण महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातूनही ही आकडेवारी पुढे आली आहे. महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालाच्या वेळी तर हा मुद्दा प्रकर्षांने चर्चेत येतो. मात्र मोठे बांधकाम व्यावासयिक, राजकारणी मंडळींनीच नाल्यावर अतिक्रमणे केली असल्यामुळे या सर्व गोष्टीकडे काणाडोळा केला जातो. नालेसफाईच्या मुद्दय़ावरून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग असलेली राजकारणी मंडळी पाहता नागरिकांनाच आता नालेसफाईबाबत आग्रहाची भूमिका घ्यावी लागणार आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, याबाबत साशंकता आहे. मात्र भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनाच आता दबाव निर्माण करावा लागणार आहे. अन्यथा दरवर्षी नालेसफाई, त्यासाठी होणारी कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी आणि त्यावरील वाद या गोष्टींचे गुऱ्हाळ सुरूच राहील, हे निश्चित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2019 2:59 am

Web Title: issue regarding drainage cleaning in pune city
Next Stories
1 राज्यात पाच दिवस उष्णतेची लाट
2 राज्यसेवेच्या पदांमध्ये वाढ
3 पुण्यात बर्गर किंगच्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे, रिक्षावाला थेट ICUत
Just Now!
X