पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवर एका आयटी इंजिनिअरने पत्नीचा आणि चार वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बाणेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. ते बाणेर येथील एका कंपनीत कामाला होते. पत्नी भूमिका आणि चार वर्षांचा मुलगा नक्ष बरोबर ते बाणेरमध्ये राहत होते.  मागील दिवसांपासून पटेल यांचे घर बंद होते. अनेक दिवस घर बंद असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना घरामध्ये तिघांचे मृतदेह अढळले. पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण स्पष्टपणे दिसत होते. तर मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता. मागील काही दिवसांपासून तिघांचेही मृतदेह त्याच अवस्थेत पडून होते. एकाच वेळी या दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पतीचा आणि मुलाचा खून करून जयेशकुमारने स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या तिघांच्याही आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.