05 March 2021

News Flash

कोंडीमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांची विशेष मेाहीम; चार दिवसांत १२ हजार जणांचा ‘ऑनलाइन’ निषेध

हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात आणि ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना येत असलेले अपयश लक्षात घेऊन हिंजवडी परिसरात काम करणारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो कर्मचारी (आयटिअन्स) वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एकवटले आहेत. ‘फ्री अप हिंजवडी’ या मोहिमेद्वारे लढा देण्यास सुरुवात झाली असून अवघ्या चार दिवसांत तब्बल १२ हजार जणांनी ऑनलाइन माध्यमातून स्वाक्षरी करत वाहतूक कोंडीचा निषेध केला.

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. हिंजवडी परिसरातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे दररोज हजारो कर्मचारी नियमित जा-ये करीत असतात. तीन ते सहा किलोमीटर अंतरावरील कंपन्यांमध्ये जाण्यासाठी आयटिअन्सना वाहतूक कोंडीमुळे किमान दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागत आहे. वर्षांनुवर्षे ही परिस्थिती कायम असून वाहतूक कोंडी दूर करण्याची केवळ चर्चाच होत आहे. हायपरलूप, मेट्रो, बीआरटी, नव्याने काही पर्यायी मार्ग असे आश्वासन आयटिअन्सना देण्यात येत आहे. पण वाहतूक कोंडी होणाऱ्या लहान-मोठय़ा बाबींकडे शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळेच आता ही कोंडी फोडण्यासाठी ‘फ्री अप हिंजवडी’ ही मोहीम आयटिअन्सनी हाती घेतली आहे. त्याबाबतची माहिती या मोहिमेचे समन्वयक सुधीर देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवर होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यापूर्वीही आयटिअन्सनी वाहतूक सुधारणेचा आराखडा केला होता. आयटिअन्सना भेडसाविणारे प्रश्न मांडतानाच कोंडी होणारे रस्ते, डार्क स्पॉटची निश्चिती आणि त्यावरील उपाययोजनांचा आराखडाही त्यांनी शासकीय यंत्रणांना सादर केला होता. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, ग्रामपंचायत अशा संबंधित घटकांकडून हतबलता व्यक्त होत असल्यामुळे स्वाक्षरी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. www.change.org यावरून आयटिअन्सने स्वाक्षरी मोहीम राबवली असून या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे.

भविष्यात भीषण वाहतूक कोंडी

हिंजवडी आयटी पार्कमध्ये दोन ठिकाणाहून प्रवेश करता येऊ शकतो. भूमकर चौक आणि वाकड चौक ही दोन ठिकाणे त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. सहा वेगवेगळे मार्ग याच ठिकाणी एकत्र येतात. या भागातच प्रामुख्यानेवाहतूक कोंडी निर्माण होते. हिंजवडी आयटी पार्क सहा टप्प्यात उभारला जाणार असून दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांची उभारणी सुरु झाली आहे. उर्वरित टप्प्यांचे काम पूर्ण झाले तर वाहतूक कोंडीची समस्या भीषण होणार आहे.

शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, पीएमआरडीए, वाहतूक पोलीस आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे रस्ते आहेत. या शासकीय यंत्रणांकडे त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असून वाहतूक नियंत्रण दिव्यांची उभारणी, अतिक्रमणमुक्त रस्ते, तसेच रस्त्यांवरील खड्डय़ांची दुरुस्ती होत नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

प्रश्न नव्हे, उपायांचाही पर्याय

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचा आराखडाही यापूर्वी करण्यात आला होता. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासच्या नऊ गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करावा. पीएमआरडीएकडून या भागाचा विकास आराखडा प्राधान्याने करावा. पीएमआरडीए आणि एमआयडीसीने अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करावी. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशा काही मागण्या आयटिअन्सकडून करण्यात आल्या आहेत.

हे उपाय..

  • मुख्य रस्ते आणि उपरस्त्यांवरील खड्डय़ांची दुरुस्ती
  • रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हटविणे
  • सूस-नांदे-चांदे ते हिंजवडी रस्त्याचे रुंदीकरण करणे
  • म्हाळुंगे ते हिंजवडी रस्ता पूर्ण करणे
  • मारूंजीकडून येणारा रस्ता विकसित करणे

कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम

वाहतूक कोंडीमुळे तीन लाख कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तीन ते सहा किलोमीटर अंतरासाठी दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागतो. प्रती दिन किमान एक लाख वाहने हिंजवडी आयटी पार्ककडे जातात. वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात असल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवरही परिणाम होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:57 am

Web Title: it fight for traffic free hinjewadi
Next Stories
1 उद्योगांच्या यशस्वितेसाठी शेअर बाजारात नोंदणी आवश्यक!
2 स्थळ विशेष : अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ‘प्रभु ज्ञानमंदिर’
3 दहावीच्या निकालातही घसरण
Just Now!
X