राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे या दोन्ही शहरांमध्ये करोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून विविध योजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्ह्यातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने तीन जम्बो रुग्णालयं उभारण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर आता करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे बिल सरकारी दरानुसार आहे की नाही याची देखील तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले आहे.

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

खासगी रुग्णालयातून करोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिलं आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का? याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही अजित पवार यांनी यावेळी दिल्या. तसेच, पुणे जिल्हयातील ‘करोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेऊन, तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. तसेच, करोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच, करोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तर, विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी करोना उपचार व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ तसेच संभाव्य स्थिती विचारात घेत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देखील जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देत, कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात येत असल्याचे सांगितले. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात करोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, सहकार आयुक्त अनिल कवडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.