महाविकास आघाडीचं सरकार दोन महिनेही टिकणार नाही असं जेव्हा आम्ही शपथ घेतली तेव्हा भाजपाचे नेते म्हणत होते. आमच्या सरकारला वर्ष पूर्ण झालं. आताही भाजपाचे लोक हेच म्हणत आहेत की सरकार पडेल. मला खात्री आहे की उरलेली चार वर्षे हेच म्हणण्यात जातील याची मला खात्री आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांनी टोला लगावला आहे. हे सरकार लवकरच पडेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केलं होतं. ज्याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आता फक्त स्वप्न पहावीत असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी त्यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. परंतु हे सरकार चार वर्ष चालणार नाही. त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत. आता हे उघड करता येणार नाही. आम्ही रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत आणि सगळया प्रश्नांवर आवाज उठवित आहोत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी काल जे वक्तव्य केलं होतं त्याबाबत आज जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांना प्रतिक्रिया विचारली असता भाजपाची पुढची चार वर्षे आमचं सरकार पडेल हे म्हणण्यातच जातील असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी आता फक्त स्वप्नं पहावीत असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.