करोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात आहे. अशात करोनावरची लस कधी येणार हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे. अशात सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी उत्तर दिलं आहे. करोनावरची लस येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. “सिरम इन्स्टिट्युटने ऑक्सफोर्डसोबत लस बनवण्यासाठी करार केला आहे. सध्या ऑक्सफोर्ड कडून लसीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे निकाल आले की लस नेमकी कधी येणार यासंदर्भात आपण बोलू शकतो” असंही पूनावाला यांनी सांगितलं आहे.

करोनावर जी लस उपलब्ध करुन द्यायची आहे ती बाजारात आणण्याची घाई किमान आम्ही तरी करणार नाही. ही लस नेमका काय परिणाम साधते? तसेच ती किती सुरक्षित आहेत याची जोपर्यंत खात्रीलायक उत्तरं मिळणार नाहीत तोपर्यंत लस बाजारात येणार नाही. यासाठी पुढील सहा महिने लागू शकतात असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.

पूनावाला म्हणाले, जोपर्यंत करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणारी लस किंवा औषध सापडत नाही तोपर्यंत अधिकाधिक वैद्याकीय चाचण्या करणे हेच उद्दिष्ट असायला हवे. भारतात सध्या होत असलेल्या चाचण्यांची संख्या अत्यल्प असून आपण पुरेश्या चाचण्यांच्या जवळपासही अद्यााप पोहोचलेले नसल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट के ले. करोनाबाबत कोणाची चाचणी करावी आणि कोणाची नाही याबाबत अद्याापही शासनाचे निर्बंध आहेत.

लक्षणे नसलेल्या व्यक्तीकडून संसर्ग पसरण्याचा धोका मोठा आहे, ही बाब विचारात घेऊन चाचण्यांबाबतचे धोरण बदलण्याची गरज आहे. चाचणी करुन लागण असलेला रुग्ण लवकरात लवकर विलग होईल हे पहाणे हिच सध्याची गरज आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे होत असलेल्या चाचण्या मर्यादित आहेत. पुरेश्या चाचण्यांच्या जवळपासही आपल्या चाचण्यांची संख्या नाही, हे प्रमाण आणखी कितीतरी वाढवणे आवश्यक असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले. लस उपलब्ध होण्याबाबत पूनावाला म्हणाले, लस निर्मितीतील सर्व टप्पे काळजीपूर्वक पूर्ण करुन, त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच लस बाजारात येईल. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.