सकाळपासून हवेत उष्मा, दुपारच्या वेळी प्रचंड उकाडा, पाठोपाठ आकाशात दाट काळ्या ढगांची गर्दी, इतकी की कोणत्याही क्षणी धुवांधार पाऊस पडेल असेच वातावरण, काही भागात तर विजांचा कडाकडाट अन् ढगांच्या गर्जनासुद्धा. एवढं सर्व होऊनही दिलासा नाहीच, कारण दुपारपासून झालेल्या वातावरण निर्मितीनंतरही सारेच ‘ओम फस्स’ होते.. हवामानतज्ज्ञांच्या मते हे होण्यास बाष्पाची हवेतील कमतरता हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ही हुलकावणी होण्यात विशेष असे काहीच नाही. पुढील दोन दिवसांतही असाच अनुभव आला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
पुणे आणि एकूणच महाराष्ट्राच्या दृष्टीने या वेळचा उन्हाळा वेगळा ठरला आहे. त्यात इतके चढउतार आले की एप्रिल निम्मा उलटला तरी उन्हाळा अनुभवायलाच मिळाला नाही. गेल्या आठवडय़ाभरात तापमानात वाढ झाली, मात्र ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण होत आहे. तसा अंदाजही दररोज वेधशाळेतर्फे जाहीर करण्यात येत आहे. विशेषत: गेल्या शुक्रवारपासून तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. गेले तीन चार दिवस तर पुण्याचे कमाल तापमान ३९ अंशांच्या वर कायम राहत आहे. लोहगाव येथे ते मंगळवारी ४०.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. याच दिवसांत उकाडय़ामुळे ढगांची निर्मिती होत आहे. सायंकाळच्या वेळी तर काळे ढग आकाशात दाटत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण होत आहे. मात्र, त्यानंतर वातावरण निवळत असल्याने त्यचा काहीही उपयोग होत नसल्याचा अनभव येत आहे. याउलट या ढगांमुळे रात्रीच्या वेळी तापमान फारसे खाली उतरत नाही, मात्र त्यामुळे त्रासदायक उकाडय़ाचा अनुभव घ्यावा लागत आहे.
याबाबत पुणे वेधशाळेचे अधिकारी डॉ. पीसीएस राव यांनी सांगितले की, उन्हाच्या झळांमुळे मोठय़ा प्रमाणात ढग तयार होत आहेत. त्यांची उंचीसुद्धा खूप जास्त आहे. मात्र, त्यांच्यात पाऊस पडण्याइतपत पुरेसे बाष्प नाही. त्यामुळे पावसाची हुलकावणी मिळत आहे. या ढगांना अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावरून बाष्प मिळत नाही. तसे ते मिळाले असते तर निश्चितपणे जास्त प्रमाणात पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले असते. पुढील दोन दिवस असेच वातावरण कायम राहील, त्यानंतर तर वातावरण अधिक कोरडे होईल. त्यामुळे नजीकच्या भविष्यात तरी वादळी पावसाची शक्यता कमीच आहे, आणि तो पडला तरी तो विस्तृत भागावर पडणार नाही.