अभूतपूर्व महाप्रलयाने अनेकांचे जीव घेतले. मृत्यू सातत्याने पाठलाग करीत असताना त्याच्या दाढेतून आम्ही सुखरूप परतलो, त्यामुळे हा आमचा नवा जन्मच आहे, अशी भावना शनिवारी उत्तराखंडमधून परतलेल्या अनेक यात्रेकरूंनी व्यक्त केली. उत्तराखंडमधील प्रलयातून सुरक्षित बाहेर पडून दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे वास्तव्यास असलेले सुमारे नव्वदहून अधिक प्रवासी रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेसने पुण्यात दाखल झाले.
पुणे जिल्ह्य़ातील सुमारे सव्वातीनशे यात्रेकरू उत्तराखंडमधील केदारनाथ व इतर ठिकाणी अडकून पडले होते. त्यातील सुमारे सव्वाशे यात्रेकरू परतले आहेत. महाप्रलयातून बाहेर काढून महाराष्ट्रातील यात्रेकरूंना दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ठेवण्यात येत असून, तेथून वेगवेगळ्या रेल्वेच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात आणण्यात येत आहे. त्यातील नव्वदहून अधिक यात्रेकरू गोवा एक्स्प्रेसच्या विशेष बोगीमधून पुणे स्थानकावर पोहोचले. स्थानकावर आपल्या आप्तांना पाहताच अनेक यात्रेकरूंचे डोळे पाणावले, तर सुखरूप परत आल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर होता.
उद्धव लंके हे यात्रेकरू म्हणाले, मृत्यू आमचा पाठलाग करीत होता. आम्ही केदारनाथ सोडले व काही वेळातच महाप्रलयाला सुरुवात झाली. हा प्रलय आमचा पाठलाग करीत होता व आम्ही पुढे-पुढे पळत होतो. पाण्याने रौद्ररूप घेतले होते. वाटेत येणारी घरे, झाडे, टेकडय़ा सर्वकाही बाजूला सारून पाणी पुढे जात होते. जाताना आम्ही तेथील निसर्गाचा आनंद घेतला, पण परतताना त्याच निसर्गाचे भयावह रूप पाहिले.
पारूबाई कदम या यात्रेकरू म्हणाल्या, आम्ही सुखरूप आलो, हीच मोठी गोष्ट आहे. एक डोंगर ढासळण्याच्या स्थितीत असताना नदीच्या जवळून आम्ही जीव मुठीत धरून रस्ता पार केला.
यात्रेकरूंनी शासनाचेही आभार मानले. महाराष्ट्र सदन येथे आणल्यानंतर राहण्याची व भोजनाची चांगली व्यवस्था झाली. रेल्वेच्या तिकिटाची व्यवस्था करण्याबरोबरच प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदतही देण्यात आली.
 निगडीतील यात्रेकरू महिलेचा मृत्यू
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या निगडीच्या यमुनानगर भागातील आशा काटे (वय ५८) या महिलेची महाप्रलयातून सुटका करण्यात आली होती, मात्र रुद्रप्रयाग येथील एका हॉटेलात वास्तव्यास असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.